गडचिरोली : वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कुख्यात नक्षल कमांडर तारक्का हिनं पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेनगुंडा या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा गड असलेल्या परिसरात जात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलीस अधिक्षक निलोत्पल यांचं नक्षलग्रस्त पेनगुंडा इथं 24 तासात पोलीस मदत केंद्र उभारल्यामुळे कौतुक केलं. दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अहेरी ते गर्देवाडा या नक्षलग्रस्त परिसरात पहिलीच बससेवा सुरु करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 77 वर्षानंतर या गावात लालपरी बससेवा सुरू झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
अहेरी ते गर्देवाडा पहिल्यांदाच बससेवा सुरू :देशाला स्वातंत्र्य मिळून आता मोठा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गावात सरकारची लालपरी पोहोचली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातून केली. त्यांनी नक्षलवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या पेनगुंडा परिसरात नवीन वर्षाची सुरूवात केली. यावेळी त्यांनी अहेरी ते गर्देवाडा या मार्गावर बससेवा सुरू केली. त्यामुळे आता नक्षलग्रस्त परिसरात बससेवा सुरू झाल्यानं नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत.