मुंबई Mumbai Fraud News : बनावट कागदपत्रे तयार करून एका कंपनीच्या संचालकाने वांद्रेतील बिल्डरची 63 कोटींची फसवणूक (Fraud)केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सेठिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह कंपनीचे संचालक वसंतराज सेठीया (वय 58), तत्कालीन संचालक अक्षय कोठारी (वय 60), रितेश ओंबाळकर (वय 43) यांच्याविरुद्ध खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण : वांद्रे परिसरातील निर्मलनगर येथे राहणारे बिल्डर वामन माडये (वय 62) यांनी खेरवाडी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्यांची राजहंस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नावाने कंपनी गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहे. वामन यांनी पार्टनरशिपमध्ये स्वराज असोसिएट नावाने एक कंपनी स्थापन करून निर्मल नगरमधील तीन मालमत्ता खरेदी आणि विकास करारनाम्याद्वारे मिळवल्या होत्या. त्याचप्रमाणे तीन मालमत्ता वामन यांनी वैयक्तिक खरेदी आणि विकास करारनाम्याद्वारे मिळवल्या. या सहा मालमत्तांपैकी चार मालमत्तांवर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबवून त्यांच्या विकास करण्यात येणार होता. मात्र निर्माण नगर गौशा सहकारी गृहनिर्माण संस्था येथील तीन प्लॉटचे एकत्रित क्षेत्रफळ असलेली 640 चौरस मीटरची मोकळी जागा असून तेथे पत्रा मारलेला आहे.
2010 मध्ये केला होता करार: या मोकळ्या जागेवर वसंतराज सेठिया याने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलं आहे. याबाबत वामन यांनी पोलिसांकडं तक्रार दाखल केली आहे. या मालमत्तेच्या विकासासाठी आवश्यक असलेली रक्कम स्वराज असोसिएट अथवा वामन माडये यांच्याकडं नसल्यानं ते गुंतवणूकदारांच्या शोधात होते. सेठीया इन्स्फास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह कंपनीचे संचालक बसंतराज सेठीया यांनी 2010 मध्ये या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान स्वराज असोसिएटचे पार्टनर शामजी पटेल आणि रितेश पटेल यांनी मालमत्तेचा विकास करण्या ऐवजी त्याचा काही हिस्सा विक्री करण्यास इच्छुक असल्यानं सेठिया यांनी त्यांचा हिस्सा विकत घेण्याची तयारी दाखवली. ऑक्टोबर 2010 मध्ये एक करार करण्यात आला. या करारानुसार जमीन मालमत्ता वामन माडये यांची राहणार होती. तसेच विकासासाठी लागणारा सर्व पैसा सेठिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुरवणार होती.
अशी केली फसवणूक :बांधकामासाठी येणारा खर्च वजा करून होणाऱ्या नफ्यातून वामन यांचा हिस्सा 30 टक्के तर सेठिया यांचा 70 टक्के हिस्सा राहणार होता. आगाऊ रक्कम म्हणून सेठिया हे माडये यांना दहा कोटी रुपये देणार होते. पण त्यांनी साडेचार कोटी रुपये देत यातील दोन कोटी पाच लाख वीस हजार रुपये विकास कामाचा खर्च म्हणून घेतला. तर दुसरीकडं सेठिया आणि अक्षय कोठारी यांनी नियोजनबद्ध कट रचून फसवणूक करण्याच्या हेतूने सर्व कृती केली. या कटात डिसेंबर 2013 मध्ये वामन यांच्या नावाची खोटी ऍडमिशन कम रिटायरमेंट डिड तयार करण्यात आली. त्या माध्यमातून स्वराज असोसिएटमधून वामन यांनी निवृत्ती घेऊन सेठिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नवीन पार्टनर म्हणून समावेश करण्यात आला असल्याचं भासवलं. अशा प्रकारे तक्रारदार वामन माडये यांची फसवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. आता यामध्ये खरंच फसवणूक झाली आहे का, याबाबत सर्व गोष्टी तपासाअंतीच स्पष्ट होतील.
हेही वाचा -
- वसतिगृह बांधण्याच्या नावाखाली उकळले 9 कोटी; 'तिकडी'विरोधात गुन्हा दाखल - Mumbai Fraud News
- 3000 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या सीएला अटक; काय आहे प्रकरण?
- सावधान! प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या नावाखाली 500 जणांची फसवणूक, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश