नाशिक Brutal murder - पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंडमध्ये मध्यरात्री एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आलीय. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रक्ताच्या थारोळ्यात गगन -नाशिकच्या पंचवटी परिसरातील मेरी कंपाऊंड भागात मराठा समाजाच्या वसतीगृहाबाहेर गगन प्रवीण कोकाटे (वय 28) रा. वृंदावन नगर, म्हसरूळ, नाशिक या युवकाची मंगळवार 20 तारखेला मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या केली. ही घटना सकाळी काही लोकांच्या निदर्शनास आल्यानं उघडकीस आली आहे. याबाबत सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्यानंतर याची माहिती पंचवटी पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.