पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. वारकरी संप्रदायातील तरुण उमदे आणि अभ्यासू नेतृत्व, कोल्हापूर विभागाचे संघाचे कार्यवाहक आणि शिव व्याख्याते म्हणून देखील शिरीष महाराज अवघ्या महाराष्ट्राला परिचित होते. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार : आज पहाटेच्या सुमारास शिरीष महाराज यांनी आपलं जीवन संपविल्याची माहिती मिळताच देहू रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर संध्याकाळी देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ही घटना समस्त देहू करांसाठी आणि मोरे कुटुंबीयांसाठी धार्मिक, अध्यात्मिक आणि कौटुंबिक नुकसान करणारी आहे. तर महारांचं निधन अकस्मात झालं आहे का? या संदर्भात पोलीस चौकशी करतील. मात्र, तोपर्यंत त्यांच्या चाहत्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता या दुःखात आम्हाला आधार द्यावा असं त्यांचे काका महेश मोरे यांनी सांगितलं.
राहत्या घरी केली आत्महत्या : ह.भ प शिरीष महाराज मोरे हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर नुकताच काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह ठरला होता आणि साक्षीगंधाचा कार्यक्रमही झाला होता. घरी त्यांच्या विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती. संपूर्ण कुटुंब आनंदात असताना अचानक घडलेल्या या घटनेने मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसंच मोरे यांनी नवीन घर बांधलं होतं. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहात होते. आज सकाळी ते खाली आले नाही म्हणून घरचे बघायला गेले असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी घराचे दार तोडण्यात आले तेव्हा त्यांनी आत्महत्या केल्याचं निदर्शनास आल्याची माहिती, महेश मोरे यांनी दिली. तर याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा -