बीड Heavy Rain In Beed : आष्टी तालुक्यातील कडा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गांवरील तात्पुरता केलेला पूल वाहून गेल्यानं वाहतूक बंद झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं अहमदनगर कडा जामखेड बीड या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु आहे. कडा इथं कडी नदीवरील जुना पूल तोडून नवीन पूल बांधकाम सुरु होतं. या रस्त्यावरील वाहतूक तात्पुरत्या पुलावरून वळवण्यात आली. मात्र सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसानं कडी नदीला पूर आला. या पुराच्या जोरदार प्रवाहानं हा पूल वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक बंद झाली आहे.
मुसळधार पावसानं उडवली दाणादाण :बीड जिल्ह्यात आठ दिवसाच्या उघडीपीनंतर कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या भागातील रस्त्याची दुरावस्था झाली, अशा रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच राज्य महामार्गावर चालू असलेली कामं धिम्या गतीनं चालू आहे. या मार्गावर करण्यात आलेली तात्पुरत्या स्वरूपातील पूल आणि कामाला पावसाचा जोरदार फटका बसला. त्यामुळे बीड अहमदनगर रस्त्यावरील कडा येथील कडी नदीवर असलेला पूल वाहून गेल्यानं नगरकडं जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली. यामुळे नागरिकांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. कंस्ट्रक्शन कंपनीनं गेली अनेक दिवसांपासून हे काम प्रलंबित ठेवलं, असा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून अनेक वेळा त्यांना नोटीस देखील देण्यात आली. तरीही गुत्तेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.