मुंबई Bombay High Court : जन्मदात्या आईला मारुन टाकणाऱ्या (Mother Murder) निर्दयी मुलाला फाशीची शिक्षाच देणं योग्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिला. 63 वर्षीय आईची हत्या करुन तिचे अवयव भाजून खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नराधमाची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली. कोल्हापूर सत्र न्यायालयानं 2021 मध्ये सुनील कुंचीकोरवी याला हत्येप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्यानं मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
दारुसाठी मागितले होते पैसे : सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिलं. आरोपीने दारुसाठी त्याच्या आईकडं पैसे मागितले आणि आईने पैसे दिले नाही म्हणून आरोपीनं थेट आईची हत्या केली होती. याकडं वकिलांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. आरोपी सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात आहे. निकालाच्या वेळी तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी फॉरेन्सिक अहवाल आणि डीएनए चाचणीवरुन हत्या झालेल्या महिलेची ओळख निश्चित केली होती.
आरोपीला फाशी : यापेक्षा भयानक आणि निर्घृण प्रकार आपण पाहिलेला नाही, आरोपीला फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिली तर तो कारागृहातील इतर आरोपींसाठी देखील धोकादायक ठरू शकतो, असं मत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी व्यक्त केलं. या प्रकरणी आरोपीतर्फे अॅड युग चौधरी यांनी काम पाहिलं. न्यायालयानं याबाबत निर्णय घेण्यापूर्वी आरोपीची मानसिक स्थिती, पार्श्वभूमी याचा विचार करावा, असं आरोपीचे वकील म्हणाले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आरोपीला 30 दिवसांचा वेळ देण्यात आलाय.
काय आहे प्रकरण? : कोल्हापूर शहरात 28 ऑगस्ट 2017 रोजी ही हत्या झाली होती. दारुसाठी पैसे मागितल्यावर आईनं पैसे न दिल्यानं सुनीलनं आईची हत्या केली होती. शाहुपुरी पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी आरोपीचा गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं निरीक्षण नोंदवून आरोपीला फाशीची शिक्षा दिली होती. एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सत्र न्यायालयानं ठोठावली तर त्या शिक्षेवर उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब करुन घेणं गरजेचं असतं. त्याशिवाय त्या शिक्षेची अंमलबजावणी करता येत नाही.
हेही वाचा -
- धक्कादायक! घरातील कामं करताना झोपमोड झाल्यानं मुलाने केली आईची हत्या - Son killed mother
- दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; मेळघाटात दारुड्या मुलानं केली आईची हत्या
- Son Killed Mother: धक्कादायक! दारूला पैसे दिले नाहीत म्हणून पोटच्या लेकाने घेतला आईचा जीव