रखरखत्या उन्हात काटेसावर झाडावर बहरली शाल्मली अमरावती Katesavar Flower Bloomed In Amravati : वसंत ऋतूचं आगमन होताच माळराणावरचं वातावरण पार बदललं आहे. पानगळतीमुळे रखरखत्या उन्हात सारं माळरान ओसाड भासत आहे. अशात डोळ्यांना आनंद देणारी लाल शाल्मली मात्र काट्याच्या निष्पर्ण झालेल्या झाडावर फुलली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आढळणारी ही शाल्मली अमरावती शहरात अनेक ठिकाणी तसेच शहरालगतच्या मालखेड, पोहरा जंगल परिसरात अनेकांचं लक्ष वेधत आहे.
असं आहे शाल्मलीचं फुल :झाडाच्या मुळापासून ते उंच टोकापर्यंत टोकदार काटे असणाऱ्या काटेसावर या झाडाची शाल्मली अशी देखील ओळख आहे. उन्हाळ्यात पानगळ झाल्यावर काटेसावरला गुलाबी रंगाची फुलं येतात. निसर्गाचा हा आगळावेगळा चमत्कारंच म्हणावा. शाल्मलीचे फुल हे छान मोठं असते. गडद गुलाबी रंगाच्या पाच पाकळ्यांचं हे फुल आहे. या फुलाच्या मधात भरपूर असे पराग कण आहेत. उन्हाळ्यात या झाडावर खारुताई आणि विविध पक्षी हे फुलं खाण्यासाठी मोठ्या संख्येनं आलेले दिसतात.
शाल्मलीच्या फुलांची होते भाजी :शाल्मली हे सुंदर दिसणारं फुल जितकं छान दिसते, तितकंच ते खाण्यासाठी देखील चविष्ट आणि गुणकारी असल्याची माहिती वनस्पती शास्त्राचे अभ्यासात श्रीनाथ वानखडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. या झाडावर आलेली फुलं एक-दोन दिवसात खाली जमिनीवर पडतात. या फुलांना वाळवून त्यांची पावडर देखील केली जाते. ही पावडर अनेक आजारांवर वापरली जाते. काटेसावरीच्या फुलांसोबतच त्यांचे काटे उगाळून चेहऱ्यावरील मुरुमांवर देखील औषध म्हणून लावले जातात. या झाडाच्या पानांचा काढा कुष्ठरोग तसेच विंचू आणि सर्पदंशावर औषध म्हणून दिले जाते, अशी माहिती देखील श्रीनाथ वानखडे यांनी दिली.
काटेसावरचं संवर्धन होण्याची गरज :आता पंचवीस, तीस वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या शेतात काटेसावरीचं एक नव्हे तर अनेक झाडं बांधावर दिसायची. होळी पेटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात या झाडांची कत्तल करण्यात आली. जंगलात वणवा लागला, तर सगळ्यात शेवटी जळणारं झाड म्हणून देखील काटेसावरची ओळख आहे. यामुळंच काटेसावरीचं झाड तोडून होळीच्या मध्यभागी ठेवून त्याची पूजा केली जाते. दरवर्षी होळीच्या निमित्तानं काटेसावरीची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. जंगलातील काटेसावर नष्ट होऊ नयेत, होळीत जाण्यासाठी याचा वापर थांबावा, यासाठी जनजागृती आणि प्रयत्नांची गरज असल्याचं देखील श्रीनाथ वानखडे म्हणाले. या झाडावरील फुलं गेल्यावर या झाडाला शेंगा लागतात. त्या शेंगांमध्ये कापूस असतो. रेशीम सारखा असणाऱ्या या कापसापासून दाद्या देखील तयार केल्या जातात, अशी माहिती देखील श्रीनाथ वानखडे यांनी दिली.
हेही वाचा :
- काय सांगता! मेळघाटात चक्क आंब्याच्या झाडाला दाढी; दाढीवाला आंबा अशी खास ओळख
- जिथं 'खडशिंगी वृक्ष' तिथं सापाला 'नो एन्ट्री'; मेळघाटच्या जंगलात आढळणाऱ्या वृक्षाची काय आहे खासियत?
- मेळघाटात 'सिपना पटेल'चा आहे अनोखा थाट, जाणून घ्या आदिवासी बांधव का करतात 'सिपना पटेल' वृक्षाची पूजा