मुंबई Vistara Flight Bomb Threat : पॅरिस चार्ल्स द गॉली विमानतळावरून निघालेल्या विस्तारा विमानात (Vistara Flight) हस्तलिखीत बॉम्बची धमकी देणारी नोट सापडल्यानंतर आज मुंबई विमानतळावर अलर्ट घोषित करण्यात आला होता. क्रूने सकाळी 10:08 वाजता एअर सिकनेस बॅगवर धमकीची सूचना दिली आणि 294 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स घेऊन विमान सकाळी 10:19 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे (Emergency landing) उतरलं.
मुंबई विमानतळावर केलं इमर्जन्सी लँडिंग : याबाबत विस्तारा एअरलाईन्सकडून माहिती देण्यात आली की, आमच्या कर्मचाऱ्यांनी 2 जून 2024 रोजी पॅरिस ते मुंबईला जाणारे विस्तारा फ्लाइट UK 024 ऑनबोर्ड करताना सुरक्षेची काळजी लक्षात घेऊन अफवेची माहिती दिली होती. प्रोटोकॉलचं पालन करून, आम्ही ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं. हे विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं आहे. आम्ही सर्व अनिवार्य तपासण्यांसाठी सुरक्षा यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहोत. विस्तारा येथे आमचे ग्राहक, कर्मचारी आणि विमान यांची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
या आधीही अशी एक घटना : शनिवारी देखील चेन्नईतून मुंबईत येणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. यावेळी विमानात १७२ प्रवासी होते. चेन्नईतून शनिवारी सकाळी ६:५० वाजता या विमानानं मुंबईसाठी उड्डाण केल्यानंतर विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीची माहिती वैमानिकाला मिळाली होती. त्यानंतर त्यानं तातडीनं मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि त्या धमकीची माहिती दिली. या माहितीनंतर मुंबई विमानतळावर सर्व आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्या. अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिका आदी सज्ज ठेवण्यात आले होते.
बॉम्बची धमकी देणारी नोट : शनिवारी मुंबई चेन्नईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-5314 च्या बाथरुममध्ये एक हस्तलिखीत बॉम्बची धमकी देणारी नोट आढळून आली होती. त्या नोटमध्ये फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचं लिहिलं होतं. त्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आलं. सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे, पण काहीही संशयास्पद आढळलं नाही. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ५०६ (२), ५०७, ५०५ (१) (बी) अन्वये गुन्हा दाखल केलाय. यानंतर, शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास विमान घाईघाईनं मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं. या दरम्यान, फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं होतं.
हेही वाचा -
- जयपूर विमानतळ उडवून देण्याच्या धमकीचा निनावी ईमेल, सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क
- Flight Emergency Landed : जामनगर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग; बॉम्ब असल्याचा संशय
- Bomb Threat Zaveri Bazar : झवेरी बाजारामध्ये बॉम्ब स्फोटाची धमकी देणाऱ्या एकाला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई