मुबंई Jayant Patil :महात्मा गांधी जयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीन मुंबई शहरात लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्रालयासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून रिगल सिनेमा जवळ असलेल्या लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. लॉंग मार्चला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मित्र पक्ष 'कमळा'त विलीन होतील -देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना 2029 साली भाजपा स्वबळावर सत्तेत येईल आणि 2024 विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांच्या मदतीनं सत्तेत येणार असल्याचं ते बोलले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राज्यातील दोन पक्ष फोडून, 2024 साली निवडणुकीत त्यांचा आधार घेण्याची पाळी भाजपावर आली. तो पक्ष 2029 साली कसा येणार असा खोचक टोला पाटील यांनी भाजपाला लगावला. मित्र पक्षातील बरेच नेते कमळाच्या चिन्हावर उभे राहिले असते. मात्र कमळाची परिस्थिती राज्यात अवघड असल्यामुळे ते कमळावर उभे राहणार नाहीत. तर 2029 साली हे दोघे मित्र पक्ष 'कमळा'त विलीन होतील, मग एकमुखी कमळाचे राज्य आणण्याचा प्रयत्न करतील असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.