मुंबई BJP Protest Against Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधात कथित विधान केल्यानं आज राज्यभर भाजपाकडून आंदोलन करण्यात येत आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर आदी शहरात भाजापाच्या नेत्यांनी आक्रमक होत राहुल गांधी यांच्याविरोधात मोठी घोषणाबाजी केली. मुंबईत घाटकोपर इथं भाजपा नेत्या पंकजा मुंडे तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
राज्यभर भाजपाचं राहुल गांधींविरोधात आंदोलन :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भेट दिल्यानंतर आरक्षण रद्द करण्याबाबत कथित वक्तव्य केल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला. त्यामुळे राज्यातील भाजपा नेत्यांनी आक्रमक होत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात आज राज्यभर जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत भाजापा नेत्या पंकजा मुंडे, आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "जोपर्यंत काँग्रेस नेते राहुल गांधी स्पष्टता करत नाहीत आणि संविधानाचा राहुल गांधी यांनी अवमान करत आरक्षण रद्द करण्याची जी भाषा केली आहे. त्यामुळे राहुल गांधी याबाबत स्पष्ट करुन आरक्षण मिळालेल्या वंचितांबद्दल मागत नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक चालू असताना भाजपा आरक्षण रद्द करणार, रद्द करणार, अशी काँग्रेसनं भाषण करून लोकांना भूलथापा देऊन त्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु आज त्यांच्या पोटातलं त्यांच्या ओठात आलेलं आहे. आपल्या देशाची गरिमा देशाच्या बाहेर गेलेल्या प्रत्येक जाती-धर्माच्या माणसानं ठेवली पाहिजे. देशाची गरिमा खराब करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. संविधानाचा अवमान त्यांनी करायला नको होता. याबाबत त्यांनी खुलासा करायला पाहिजे. सोबत त्यांच्या मित्र पक्षांनीही राहुल गांधींच्या भूमिकेशी ते सहमत आहेत का? याबाबत सुद्धा खुलासा केला पाहिजे," असा हल्लाबोल त्यांनी केला.
राहुल गांधींच्या पोटातील ओठावर आलं :अमेरिकेत राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. राहुल गांधी आणि काँग्रेसपक्ष अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं आरक्षण संपवण्यासाठी प्रयत्नरत आहे, असा आरोप करत भाजपानं नागपुरातील संविधान चौक इथं जोरदार आंदोलन केलं. यावेळी भाजापा कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत जोरदार निषेध केला. फक्त राहुल गांधी नाही तर त्यांच्या घराण्यात आधीच्या पिढीनं सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमीच अवमान केला. जे काँग्रेसच्या पोटात होतं, तेच अमेरिकेत जाऊन राहुल गांधींच्या ओठात आलं, असा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरवर जोडे मारत निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यकरत्यांनी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आपला रोष ही व्यक्त केला आहे.
महिलांनी मारले राहुल गांधींच्या फोटोला जोडे :अमेरिकेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाची प्रगती झाली, सगळ्या समस्या संपल्या, सर्वांना समान संधी मिळाली की आरक्षण रद्द करण्याबाबत आढावा घेतला जाईल, असं कथित वक्तव्य केलं. या विधानामुळे भाजपानं काँग्रेस विरोधात रान उठवण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी देशात भाजपातर्फे आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी गृह निर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत आंदोलन पुकारलं. क्रांतीचौक भागात राहुल गांधी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजपा संविधान बदलणार असा प्रचार करणारे स्वतः आज तो बदलण्याची भाषा करत असल्यानं काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आला, असा आरोप मंत्री अतुल सावे यांनी केलाय. यावेळी क्रांतीचौक भागात काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपा महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला. देशातील रोष आज व्यक्त केला जात असून, जोडे मारले जातात ही सुरुवात आहे. राहुल गांधी देशात आल्यावर जर शहरात आले तर त्यांना पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिलाय.