प्रतिक्रिया देताना मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (ETV BHARAT Reporter) हैदराबाद RSS Mouthpiece Criticize To BJP :सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरातील कार्यक्रमात भाजपा नेत्यांचे अप्रत्यक्ष कान टोचले. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनाझर' या साप्ताहिकातून भाजपाला घरचा आहेर देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन एका झटक्यात भाजपानं आपली 'ब्रँड व्हॅल्यू' कमी करुन घेतली, असा हल्लाबोल ऑर्गनाझरमधून करण्यात आला. ग्राऊंड लेव्हलवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत विचारात न घेता भाजपाच्या नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका बसल्याचं यातून दिसून आलं, असंही यावेळी नमूद करण्यात आलं. संघाच्या मुखपत्रातून भाजपाला घरचा आहेर मिळाल्यानं त्याची मोठी चर्चा सध्या करण्यात येत आहे.
अजित पवारांमुळे भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली :भाजपा नेत्यांनी मागील अनेक वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात रान उठवलं आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी भाजपाचं काम करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दोन हात करुन पक्षाची प्रतिमा जनमाणसात उंचावली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी भाजपानं युती करुन त्यांना सरकारमध्ये स्थान दिल्यानं भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली. भाजपा नेत्यांच्या अजित पवार यांच्याबाबतच्या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक दुखावले गेले, असं संघाच्या मुखपत्रातून नमूद करण्यात आलं.
शरद पवार भाऊबंदकीत दोन तीन वर्षात संपले असते :राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकात रतन शारदा यांनी 10 जूनला Modi 3.0 : Conversation for course correction हा संपादकीय लेख लिहला आहे. यात त्यांनी भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी युती केल्याचा फटका कसा बसला, याबाबतचं भाष्य केलं आहे. "महाराष्ट्रात अनेक उलटफेर करणारं राजकारण भाजपा नेत्यांनी केलं. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसोबत भाजपानं सत्ता स्थापन केली. मात्र शरद पवार हे दोन ते तीन वर्षात चुलत भाऊबंदकीच्या राजकारणातील भांडणात संपले असते. त्यांची भाऊबंदकीतच शक्ती वाया गेली असती. मात्र भाजपा नेत्यांनी हे चुकीचं पाऊल का उचललं," असा सवालही या लेखातून भाजपा नेतृत्वाला करण्यात आला.
पक्षांतर करणाऱ्यांना अधिक महत्व :"नरेंद्र मोदी हे 543 जागांवर लढत होते. मात्र लोकसभा निवडणूक लढवत असताना अनेक ठिकाणचे खासदार बदलण्यात आले. स्थानिक भाजपा नेत्यांवर विश्वास ठेऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांना नको तितकं महत्व देण्यात आलं. त्यामुळे मूळ भाजपाचे कार्यकर्ते दुखावल्या गेले. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना अवास्तव महत्व दिल्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या नेत्यांनाही डावललं गेलं. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये तब्बल 25 टक्के नेते पक्षांतर केलेले होते. हिमाचल प्रदेशातील बंडखोरांचा अनुभव असूनही भाजपा नेत्यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांना महत्वाचं स्थान दिलं. भाजपाच्या कोणत्याही आमदार, खासदारांना सहजा सहजी भेटता येत नव्हतं, इतके नेते व्यस्त होते," अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
अजित पवार यांना भाजपा सरकारमधून काढणार - महेश तपासे :"अजित पवार यांना भाजपासोबत घेणं ही चूक असल्याचा दावा भाजपाच्या मातृसंस्था असलेल्या आरएसएसनं केला आहे. अजित पवार यांच्यावर सर्वात पहिले आरोप करणारा पक्ष कोणता तर भाजपा. अजित पवार यांना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करणारे नेते कोण, तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस. देशातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करप्ट पार्टी आहे, असा उल्लेख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. अशा प्रकारचा आरोप केला असताना देखील भाजपानं अजित पवार यांना आपल्या सोबत घेऊन सरकारमध्ये स्थान दिलं. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाला देशात आणि महाराष्ट्रात फटका बसला, असा दावा आरएसएसच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे. याचा अर्थ आता स्पष्ट झाला आहे की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा अजित पवार यांना सरकारमधून बाहेर काढून त्यांच्यासोबत युती करायची की नाही, याबाबत भाजपात आत्मचिंतन सुरू झालं असेल," असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.
हेही वाचा :
- भाजपाबरोबर जाण्यासाठी लोकांनी इतर पक्षांना मतं दिली नव्हती, शरद पवारांचा अजित पवारांना टोला - Sharad Pawar Baramati Visit
- दहा वर्षात प्रगती झाली, पण प्रश्न सुटले नाहीत: वर्षभरापासून मणिपूर अशांत, तिकडं लक्ष द्या, सरसंघचालकांनी टोचले कान - Mohan Bhagwat On Manipur Crisis
- मणिपूर हिंसाचारावरुन मोदी सरकारला इशारा?, मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या अर्थ काय? - Mohan Bhagwat On Manipur violence