नांदेड : लोहा तालुक्यातील किवळा येथे सहा दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं अहवालातून निष्पन्न झालं आहे. त्यामुळे किवळा परिसर 'अलर्ट झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.
लोहा तालुक्यातील किवळा परिसरात कोंबडी तसेच काही ठिकाणी कावळे मृतावस्थेत आढळले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुकुट पक्ष्यांचे नमुने गोळा राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे आणि भोपाळ येथील कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. हे नमुने पॉझिटिव्ह आले असून कुकुट पक्ष्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ५६५ कुकुट पशुसंवर्धन विभागानं ताब्यात घेतले आहेत. बर्ड फ्लूचा संसर्ग टाळण्याकरिता त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे.
नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी काय काढले आदेश?
- जिल्ह्यात बर्ड फ्लूचा उद्भव झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार किवळा येथील दहा किलोमीटर परिसरात जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 'अलर्ट झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.
- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रभावित क्षेत्रात जिवंत अथवा मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, इतर संबंधित साहित्य आणि उपकरणांच्या वाहतूकीला मनाई करण्यात आली आहे.
- प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांना जाणे, तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर २ टक्के सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- प्रभावित क्षेत्राच्या ५ कि.मी. त्रिज्येतील परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने, कुक्कुट मांसाची चिकन दुकाने, वाहतूक, बाजार आणि यात्रा, प्रदर्शन आदी बाबी बंद राहतील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटलं आहे.
- नुकतेच लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे ५१ कावळे मृत्युमुखी पडल्यानंतर बर्ड फ्ल्यूचा संसर्ग रोखण्याकरिता लातूर जिल्ह्यातदेखील प्रयत्न सुरू आहेत. लातूर पाठोपाठ नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानं पोल्ट्री फार्म व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
बर्ड फ्लू मानवाला होऊ शकतो का? बर्ड फ्लूची लागण ही वन्य, जलचर पक्षी, पाळीव कोंबड्या आणि इतर पक्षी आणि प्राण्यांच्या प्रजातींना होते. असे असले तरी बर्ड फ्लूचा संसर्ग मानवांमध्येही होऊ शकतो. अशा प्रकारचे काही रुग्ण जगभरात आढळले आहेत. बर्ड फ्लूची लागण झालेल्या प्राणी अथवा पक्ष्याच्या संपर्कात किंवा संसर्ग झालेल्या वातावरणात आल्यानं मानवालाही बर्ड फ्लूची लागण होऊ शकते. बराच काळ बर्ड फ्लूचा संसर्ग असलेल्या पाण्याच्या संपर्कात असल्यानं बर्ड फ्लू होऊ शकतो.
हेही वाचा-
- ठाण्यात बर्ड फ्ल्यूचा कहर; चिकन, मटणाची दुकानं बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश
- राणीच्या बागेतील प्राण्यांच्या आहारात बदल, बर्ड फ्ल्यू आजारामुळे प्रशासन अलर्ट मोडवर
- उदगीर शहरातील कावळ्यांचा बर्ड फ्ल्यूमुळं मृत्यू; प्रशासनाकडून तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना