मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरू असताना घोषणाबाजी पुणे Lahuji Vastad Salve Memorial : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (2 मार्च) आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
काय म्हणाले एकनाथ शिंदे? : यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारे सरकार असल्यानं सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आज करण्यात आलंय. मातंग समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आणि दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं कार्य केलंय. त्यामुळं मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल. स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे", असंही ते म्हणाले. तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असताना आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचं बघायला मिळालं.
लहुजी वस्ताद यांनी शस्त्रांचं प्रशिक्षण देणारी पहिली शाळा काढली :यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य वाढविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनानंतर छत्रपतींच्या मावळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे याचा आनंद आहे. क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी शस्त्राने पारंगत वीर तयार करण्यासाठी देशातील शस्त्राचे प्रशिक्षण देणारी पहिली शाळा काढली म्हणून त्यांना आद्य म्हटलं जातं. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रशिक्षण दिलं आहे."
गरिबांसाठी घरं मिळतील :उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "लहुजी वस्तादांच्या कार्याची आठवण ठेवत तरुणांनी त्यांचा विचार स्विकारावा. तरुणांनी महापुरुषांपासून चांगला विचार घ्यायला हवा. व्यायाम, शिस्त, सचोटी आणि शिक्षणाने मेंदू बळकट करीत अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी. क्रांतीवीर लहुजी वस्तादांसारख्यांच्या कार्यातून महाराष्ट्र उभा राहीला आहे. स्मारकाच्या रूपाने त्यांच्या कार्याचा ठेवा जपला जाईल, येणाऱ्या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील. मातंग समाजाच्या कल्याणासाठी आर्टीसाठी तातडीने पाऊले उचलले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली." तसंच उरुळी देवाची नगर रचना परियोजनेद्वारे 5-6 एकरांत गरिबांसाठी घरे मिळतील, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल; २५ हजार युवांना मिळणार रोजगार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी परिसराच्या विकासकामांचं भूमिपूजन; मात्र बॅनरवरुन संभाजी महाराजच गायब, फक्त मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचेच फोटो
- शिंदे गॅंगमध्ये आता 'गॅंगवॉर' सुरू; संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला