पालघर Rahul Gandhi Speech : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूरहून सुरू केलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चं आज (15 मार्च) पालघर जिल्ह्यात आगमन झालं. मोखाडा, जव्हार, पालघर, वाडामार्गे ही यात्रा ठाण्यात पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर टीका केली. तसंच राज्यघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्र्यंबकेश्वरचा मुक्काम करून ते मोखाडा मार्गे जव्हारला आले. यावेळी ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं.
राज्यघटना बदलल्याचा कट : माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या विधानाचा समाचार घेताना राहुल गांधी म्हणाले की,"हेगडे यांना भाजपाचे नेते बोलायला भाग पाडतात. आताही संसदेत दोन तृतियांश बहुमताची भाषा करून राज्यघटना बदलण्याचा संकेत हेगडे यांनी दिलाय. परंतु कोणत्याही परिस्थितीत राज्यघटना बदलू दिली जाणार नाही." तसंच भारतीय राज्यघटना इतकी मजबूत आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी काय जगातील कोणतीही शक्ती ती बदलू शकत नाही, असंही ते म्हणाले.
आदिवासी दलितांना सत्ता, संपत्तीत भागीदारी नाही : वाडा येथे केलेल्या भाषणात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. ते म्हणाले की,"भारतामध्ये 88 टक्के लोक ओबीसी आणि मागास प्रवर्गातील असूनही त्यांना त्या तुलनेत त्यांना योग्य भागीदारी दिली जात नाही."तसंच पीकविमा योजनेसाठी सरकार 35 हजार कोटी रुपये देते. हे पैसे येतात कुठून? 16 कंपन्यांची भरपाई करण्यासाठी सरकार ही तरतूद करते. ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या जमीन अधिग्रहित केल्या जातात असा आरोप त्यांनी केला.