गुवाहाटी Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एका दिवसापूर्वी गुवाहाटी शहरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं होतं, ज्याचा त्यांनी निषेध केला. आज त्यांनी आसाममधील बारपेटा इथून भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरु केली. मंगळवारी आसाम पोलिसांनी राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांवर हिंसाचार, चिथावणी देणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.
आसामचे मुख्यमंत्री सर्वात भ्रष्ट : आज यात्रेचा 11वा दिवस सुरु होण्यापूर्वी राहुल गांधींनी एका मेळाव्याला संबोधित करत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांच्यावर हल्लाबोल केला आणि पुन्हा एकदा त्यांना सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हटलंय. ते म्हणाले, "आसामचे मुख्यमंत्री (हिमंता बिस्वा सरमा) सतत द्वेष पसरवतात आणि तुमच्या जमिनी हिसकावून घेतात. ते सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत."
राहुल गांधी आणि आसाम सरकारमध्ये तणाव : गुरुवारी त्यांनी राज्यात प्रवेश केल्यापासून भाजपाच्या नेतृत्वाखालील आसाम सरकार त्यांच्या प्रवासात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गुवाहाटीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्यानंतर हाणामारी झाली, यानंतर राज्य सरकार आणि काँग्रेस यांच्यातील वादाला मोठं वळण मिळालं. सरमा यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना काँग्रेस खासदाराविरुद्ध 'जमाव भडकवल्या'प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. यावर राहुल गांधींनी सरमा यांना देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत, असं प्रत्युत्तर दिलं.
खर्गे यांचं शहांना पत्र : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या आसाममधील भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झालेल्या सुरक्षेबाबत पत्र लिहिलंय. याबाबत गंभीर चिंता व्यक्त करताना, खर्गे यांनी अनेक मुद्द्यांचा उल्लेख करत सांगितलं की, आसाम पोलिसांनी Z+ सुरक्षेचा हक्क असलेल्या गांधींसह यात्रेतील सहभागींना पुरेशी सुरक्षा पुरवली पाहिजे.
हेही वाचा :
- भारत न्याय यात्रेत राहुल गांधींसह 'या' नेत्यांवर गुन्हा दाखल, काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल
- आसाममध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट, राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश