मुंबई : कुर्ला बर्वे मार्ग इथं 9 डिसेंबरला बेस्ट उपक्रमातील एका बस चालकाकडून बसवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेला. तर, 40 हून अधिक जण जखमी झाले. त्या 9 मृतांपैकी 3 मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना बेस्ट उपक्रमातर्फे बेस्ट महाव्यवस्थापक श्रीनिवास यांनी प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश दिला आहे. बेस्टकडून केवळ तीन मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता उर्वरित नातेवाईकांना कधी मदत मिळणार, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. दुसरीकडं बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळेही कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
अडीच महिन्यांनी बेस्टकडून आर्थिक मदत :अपघात 9 डिसेंबर रोजी झालेला असताना अडीच महिन्यांनी बेस्ट उपक्रमाकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. या आर्थिक मदतीमुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना थोडफार आर्थिक दिलासा मिळाला आहे. मात्र मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची, त्यांच्या वारसदारांची रितसर कायदेशीर माहिती बेस्टच्या विधी खात्यानं घेतली. त्याची खातरजमा केल्यानंतरच सदर आर्थिक मदत देण्यात आली. त्यामुळेच सदर मदत देण्यास थोडा उशीर झाला, असं बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आलं.