बीड Manoj Jarange Patil Beed Rally : सकल मराठा समाजाच्या वतीनं आज (11 जुलै) बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वात 'शांतता रॅली'चं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीदरम्यान होणाऱ्या गर्दीमुळं शाळकरी मुलांची गैरसोय होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आलीय. याबाबतचं पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलं असून सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्यात.
बीडमध्ये निघणार शांतता रॅली :मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. जरांगे पाटील यांनी सरकारला सगेसोयरे संदर्भात दिलेला अल्टीमेटम 13 तारखेला संपणार असून याच पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीच्या अनुषंगानं मराठा समन्वयकांकडून नाश्ता, पाणी, पार्किंग, ॲम्बुलन्स, याची व्यवस्था करण्यात आलीय. या रॅलीसाठी मराठा बांधवाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून बीड शहरात मोठमोठे बॅनर, भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅलीली सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार असून त्यानंतर जरांगे पाटील यांची सभा पार पडेल.