बीड : भूसंपादनाच्या मावेजासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता अशाच एका प्रकरणात थेट जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आलेत. बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. एस. पिंगळे यांच्या न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. तसंच न्यायालयानं या संदर्भातील वॉरंटही जारी केलंय.
नेमकं काय आहे प्रकरण? : जिल्ह्यातील शेतकरी राजेश पोकळे यांची जमीन लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर बीड यांच्या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. त्याचा मावेजा देण्याचे आदेश 2018 मध्ये देण्यात आले होते. मात्र, त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. त्यामुळं 13 लाख 19 हजाराच्या मावेजासाठी शासनाच्या वतीनं बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता यांना कैद करून, त्यांच्याकडून मावेजाची रक्कम भरणा करून घ्यावी, या आदेशाचे वॉरंट बीडच्या दिवाणी न्यायालयानं जारी केले आहेत. या वॉरंटची अंमलबजावणी 21 मार्चपूर्वी करावी, असंही यात नमूद करण्यात आलंय. दरम्यान, या आदेशामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय.