मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 10 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. मारेकरी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात होते, असा दावा मुंबई पोलिसांनी केला. एका मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून मारेकऱ्यांनी कॅनडा आणि अमेरिकेत अनमोल बिश्नोईशी संपर्क साधून त्यानंतर ते मेसेज डिलीट केल्याची माहिती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
हत्याकांडातील तीन शार्प शूटर होते अनमोल बिश्नोईच्या संपर्कात : "राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तीन संशयित मारेकरी हत्येपूर्वी अनमोल बिश्नोईशी एका मेसेजिंग अॅपद्वारे बोलले होते. अनमोल बिश्नोई हा कॅनडा आणि अमेरिकेतून मारेकऱ्यांच्या संपर्कात होता. अनमोल बिश्नोई याच्याशी फोनवर बोलणं झालेले चार मोबाईल मुंबई पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेनं आतापर्यंत 10 आरोपींना अटक केली असून त्यात दोन शूटर आणि एका शस्त्र पुरवठादाराचा समावेश आहे," अशी माहिती पोलीस सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.