मुबंई :काँग्रेस पक्षाचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेशापूर्वी अजित पवार यांनी वांद्रे येथील काँग्रेस आमदार झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजित पवार यांच्याबरोबर कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सिद्दीकी म्हणाले की, राष्ट्रवादी सेक्युलर पक्ष आहे. आजित पवार यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. आम्हाला काँग्रेस मधून सुरवातीला खासदार आमदार आणि पुन्हा आमदार म्हणून संधी मिळाली. राजकीय जीवनात तीनवेळा काँग्रेस पक्षाच्या हात चिन्हावर लढलो आहे. राजकारणात जास्त वेळा सत्तेत राहिलो विरोधात कमी. आम्ही सेक्युलर विचार धारेचे लोक आहोत. सर्व जातींचे लोक एकत्र राहात आहेत. त्यांना प्रत्येकाला सन्मान मिळाला पाहिजे. मौलाना महामंडळाला निधी वाढवून दिला. वारेमाप आश्वासनं द्यायची असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधी केलं नाही.
आज विरोधकांनी राज्यपालांना भेटून सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. मात्र 216 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा सरकारला आहे. काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या, त्यांचे समर्थन मी करणार नाही. यातून कायदा सुव्यवथा बिघडल्याची भीती दाखवायचे काम केले जात आहे. बाबा सिद्धीकी सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन काम करत आहेत. सुनील दत्त साहेबांनी त्यांची हुशारी आणि कामा प्रति प्रेम पाहूनच त्यांना पक्षाचे तिकीट दिले होते. त्यानंतर नगरसेवक, आमदार आणि राज्यमंत्री असा प्रवास झाला. लोकांची कामे करणारा नेता निवडून येते असतो, हे यातून दिसतं.