मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगनं जबाबदारी स्वीकारणारी कथित पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्यानं बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचं सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टची 'ईटीव्ही भारत' पुष्टी करत नाही.
बिश्नोई गँगची पोस्ट? :बिश्नोई गँगनं केलेल्या कथित पोस्टमध्ये अभिनेता सलमान खानचाही उल्लेख आहे. दाऊद इब्राहीमला बॉलिवुड, राजकारण आणि प्रॉपर्टी डिलिंगशी बाबा सिद्दीकी यांनी जोडल्याचा दावा करण्यात आला. सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब केला जाईल, असा इशारा देखील पोस्टमध्ये देण्यात आला आहे. एखाद्याचा जीव जाणं म्हणजे काय, हे आता तुम्हाला कळत असेल, असंही पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, "आम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट पाहिली आहे. आम्ही त्याची सत्यता पडताळत आहोत."
दिल्ली पोलिसांसह मुंबई पोलीस करणार तपास :बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा दावा केला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप सूत्रांच्या या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. या टोळीचा सिद्दीकी यांच्या हत्येत काय सहभाग आहे? याचा मुंबई पोलीस तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्ली पोलिसांचे एक पथक देखील मुंबईत तपासासाठी दाखल होणार आहे.
कुठे भेटले आरोपी? : बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या चालवणारे आरोपी हे पंजाबमधील एका तुरुंगात एकत्र होते. यावेळी त्यांची बिश्नोई गॅंगमधील एका शार्प शूटरशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी बिश्नोई गॅंगमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. सलमान खान याचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा सिद्दिकी यांचा काटा काढण्यासाठी या तिघांना अडीच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघांनी गेल्या एक महिन्यापासून रेकी केली होती. बाबा सिद्दिकी यांना मारल्यानंतर त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.