पुणे IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर यांच्याबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यांच्यावरील संकट काही कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी वापरेलेली ऑडी कार वादाच्या भोऱ्यास सापडली आहे. त्यांची ऑडी कार थर्मोवेरिटा इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड (ThermoVerita Engineering Pvt Ltd) कंपनीची असल्याचं समोर आलं आहे. या कंपनीत पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर संचालक होत्या. तसंच याच कंपनीशी सबंधित 'डिलिजेन्स इन्फ्रा प्रोजेक्ट्स' प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काही काळ पूजा खेडकर देखील संचालक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कसं मिळालं? : "पूजा यांनी ज्या ऑडी कारवर 'महाराष्ट्र शासन' तसेच लाल दिवा लावला होता ती कार थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आहे. पूजाच्या आई मनोरमा खेडकर या वरील कंपनीच्या माजी डायरेक्टर आहेत. तसंच डिलिजेन्स इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पूजा या देखील डायरेक्टर होत्या. डायरेक्टर असताना पूजा यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कसं मिळालं? याची सरकारनं चौकशी करावी. तसंच त्यांच्यावर कारवाई करावी," अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली.
ऑडी कारवर 21 चलन : पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर 21 चलन आहेत. तसंच खेडकर यांच्या गाडीनं वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांनी कारवर लाल दिवा लावला होता. तसंच त्यांनी कारवर महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं. 2022 पासून आतापर्यंत त्यांच्या कारवर वाहतुकीचे नियम मोडणे, अतिवेगानं वाहन चालवणं, सिग्नल तोडणे असे 21 चलन प्रलंबित आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच ऑडी कारची नोंदणी खासगी इंजिनिअरिंग कंपनीच्या नावावर आहे, अशी माहिती समोर येत आहे.