नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणाला काका-पुतण्याची आगळी-वेगळी परंपरा लाभलेली आहे. त्यात शरद पवार-अजित पवार, अनिल देशमुख आणि आशिष देशमुख यांचा समावेश आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे बहुतेक काका पुतणे आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकले आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा एकदा काका पुतण्यात राजकीय लढाई रंगणार असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. ते यावेळी काटोल मतदारसंघातून निवडणूक लढणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नसलं तरी त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी मात्र, काटोलमधून लढण्यास आपण उत्सुक असल्याचं अनेकवेळा बोलून दाखवलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात काका पुतण्याचा संघर्ष पाहण्यास मिळणार आहे.
काकांना दिला पराभवाचा धक्का :उमेदवारांकडून दावे प्रतिदावे केले जात आहे. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. मात्र, इच्छुकांनी आपल्या उमेदवारीची घोषणा स्वतःच केली आहे. आता नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघाकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. इथं काका पुतणे किंवा भावा-भावात लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2014 साली इथून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर डॉ आशिष देशमुख यांनी त्यांच्या काकांना पराभवाचा धक्का दिला. तर यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असा दावा आशिष देशमुख करत आहेत. त्यामुळे काटोलची राजकीय लढाई सर्वात लक्षवेधी ठरणार असल्याचं बोललं जात आहे.
काय आहे काटोल मतदारसंघाचा इतिहास : 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल देशमुख विजयी झाले. त्यांना 96 हजार 842 मतं मिळाली. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चरणसिंग बाबुलालजी ठाकूर 79 हजार 785 मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. 2014 मध्ये काटोल विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण 70 हजार 344 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल देशमुख यांना 64 हजर 787 मतं मिळाली. याशिवाय 2009 मध्ये काटोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल देशमुख विजयी झाले.