मुंबई -मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अश्विन नटवरलाल शेठ ग्रुपने दिलेल्या तक्रारीवरून अँकर लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि शाह कन्स्ट्रक्शनशी संबंधित प्रमुख व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 120B अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. तक्रारीत जादवजी लालजी शाह आणि इतर लाभार्थी, कंपन्यांचे भागधारक यांचा समावेश आहे. अश्विन शेठ यांच्या तक्रारीनुसार, हे प्रकरण 2008 मधील असून, 2008 मध्ये 51 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत अश्विन शेठ ग्रुपचे प्रमुख अश्विन शेठ यांच्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर नोंदवण्यात आलाय.
निधीचा गैरवापर केल्याचा आरोप: मिळालेल्या तक्रारीनुसार, 2008 मध्ये अंधेरी येथे जमिनीचा प्राइम प्लॉट विकसित करण्यासाठी 51 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. आरोपी व्यक्ती कराराची औपचारिकता पूर्ण करून विकास प्रक्रिया सुरू करतील, या अटीवर निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, परंतु त्याऐवजी आरोपींनी तक्रारदाराच्या माहितीशिवाय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप अश्विन शेठ ग्रुपने केलाय. अश्विन शेठ ग्रुपचे म्हणणे आहे की, “हे प्रकरण अँकर लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि शाह कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांनी केलेला विश्वासघात आणि अनैतिक पद्धतींचा पुरावा आहे. 2008 मध्ये पारदर्शक भागीदारीच्या अपेक्षेने 51 कोटींची मोठी गुंतवणूक करण्यात आली होती, परंतु ती निष्फळ ठरली. खोट्या आश्वासनांशिवाय काहीही नसून त्यांनी पैशांचा गैरवापर करून विश्वासघात केल्याचे निष्पन्न झालंय."