मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी एक आठवडा उलटून गेल्यानंतरही सरकार स्थापन होत नव्हतं. शपथविधीसुद्धा लांबणीवर गेला होता. मात्र अखेर पाच डिसेंबर (गुरुवारी) महायुतीचा भव्यदिव्य असा शपधविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, आज भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदाची नियुक्ती करण्यात आलीय. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर या तिघांमध्ये बैठक झाली. दरम्यान, यानंतर महायुतीतील नेत्यांनी राजभवन येथे जात राज्यपालाकडे आमदारांच्या संख्याबळाचं आणि बहुमत स्पष्ट असल्याचं पत्र राज्यपालांना सुपूर्द केलं. राज्यापालांनी सरकार स्थापनेसाठी महायुतीला गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता वेळ दिलीय. दरम्यान, नवीन सरकार येण्यापूर्वी या सरकारची ही शेवटची पत्रकार परिषद एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलीय.
शिंदे सरकारमध्ये राहतील : सुरुवातीला बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी उद्या सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधीची वेळ दिलीय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष अशी आमची मोठी महायुती आहे. या सर्वांच्या सहीचे पत्र राज्यपालांना दिलंय. आम्ही सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर उद्या शपथविधी पार पडणार आहे. एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये राहावं, अशी मी त्यांना काल विनंती केलीय. एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. सर्व घटक पक्षांनी आणि महायुतीतील नेत्यांनी मागील काळापासून पाठिंबा दिलाय. सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार देवेंद्र फडणवीसांनी मानलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आम्ही तिघे मिळून एकत्र सरकार चालवणार आहोत. मुख्यमंत्री हे पद तांत्रिक पद आहे. तिघं मिळून सरकारमध्ये एकत्र काम करून महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने अधिक पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. जी विकासाची काम अर्धवट राहिलीत, ज्या प्रकल्पांचे काम बाकी आहेत, त्यांचं पण कामं प्रगतिपथावर नेणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय.
मी मात्र शपथ घेणार- अजितदादा : दरम्यान पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंना विचारलं की, तुम्ही सत्तेत सहभागी होणार का किंवा उद्या शपथविधी घेणार का? यावर बोलताना शिंदे म्हणाले की, थोडं थांबा, कळ सोसा. संध्याकाळपर्यंत समजेल, एवढ्यात बाजूला बसलेले अजित पवार म्हणाले की, शिंदे सत्तेत सहभागी होणार की शपथ घेणार हे संध्याकाळपर्यंत समजेल, मी मात्र शपथ घेणार आहे, असं अजित पवारांनी म्हटल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अजितदादांना सकाळी अन् संध्याकाळी पण शपथ घेण्याचा अनुभव आहे, असा मिश्कील टोलाही एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना लगावलाय.
मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलो होतो : अजित पवार गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते, त्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, मी फक्त एक खुलासा करू इच्छितो. मी माझ्या वेगळ्या कामाकरिता दिल्लीला गेलो होतो. मी कोणालाही भेटायला गेलेलो नव्हतो. माझ्याबाबतच्या अनेक बातम्या चालवल्या गेल्या. मी कोणाला भेटायला गेलेलो नव्हतो. त्यामुळे भेट नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलो होतो, असं म्हणत अजित पवारांनी दिल्ली वारीवर खुलासा केलाय. पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. आमच्यात चांगला समन्वय आहे. महायुती सरकारने अनेक विकासकामं केलीत. सरकार चांगलं काम करतंय. जी विकासकामं बाकी आहेत, ते पुढे नेण्याचं काम करू. महाराष्ट्राला एक नंबरवर आणू, असं अजित पवार म्हणालेत. राज्याला यशवंतराव चव्हाणांपासून अनेक नेते लाभलेत. तसेच आज संध्याकाळपर्यंत कोण कोण शपथ घेणार याबाबत स्पष्ट होईल. थोडी कळ सोसा, सर्व काही आज समजेल, असं अजित पवार म्हणाले.
अडीच वर्षांत सरकारचे उत्कृष्ट काम : अडीच वर्षांपूर्वी माझ्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केली होती. आज त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी मी शिफारस केलीय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महायुतीला कधीच एवढं बहुमत मिळालं नव्हतं. हे पहिल्यांदा एवढं बहुमत मिळालंय. राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचं आम्ही पत्र दिलंय. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलंय. मागील अडीच वर्षांत अनेक लोक कल्याणकारी योजना आणल्यात. विकासकामं केलीत. खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होतंय. याचा आनंद होतोय आणि महत्त्वाचं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय दिलं हे खूप महत्त्वाचं आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. राज्य चालवताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जे प्रकल्प महाविकास आघाडीने थांबवले होते. विकासकामांना ब्रेक लावला होता. ती कामे पुढे नेली. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. अनेक प्रश्न मार्गी लावलेत, असं एकनाथ शिंदे म्हणालेत. दरम्यान, तुम्ही शपथविधी घेणार का? असा प्रश्न शिंदेंना विचारला असता, थोडं थांबा तुम्हाला सर्वकाही संध्याकाळपर्यंत समजेल, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
हेही वाचा-