नवी दिल्ली TRAI new rule : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (TRAI) प्रीपेड मोबाइल सेवेबाबत स्पष्टीकरण जारी केलं आहे. निष्क्रिय सिम कार्ड आणि व्हॉइस-ओन्ली रिचार्ज प्लॅनच्या वैधतेवर TRAI नं स्पष्टीकरण दिलंय. टेलिकॉम ग्राहक संरक्षण नियम (TCPR) सहाव्या दुरुस्ती अंतर्गत, ग्राहकाच्या खात्यात 20 रुपये शिल्लक असल्यास 90 दिवसांच्या आत त्यांचं प्रीपेड मोबाइल कनेक्शन निष्क्रिय केलं जाऊ शकत नाही, असं ट्रायनं म्हटंल आहे.
TRAI नं X वर लिहिलं की, " प्लॅन वैधतेबाबत नवीन नियम जारी केले आहेत. TCPR सहाव्या सुधारणानुसार, एखाद्या प्रीपेड ग्राहकाच्या खात्यात वीस रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम उपलब्ध असेल, तर त्यांचं मोबाइल कनेक्शन बंद केलं जाणार नाही." त्यामुळं काही सेवा पुरवठादारांनी फक्त व्हॉइस आणि एसएमएस पॅक लाँच केले आहेत. लाँचच्या तारखेपासून सात कामकाजाच्या दिवसांत याची माहिती ट्रायला दिली जाईल. लाँच केलेल्या व्हाउचर्सची तपासणी ट्रायकडून विद्यमान नियामक तरतुदींनुसार केली जाईल."
तर, सिम कार्ड निष्क्रिय
ट्रायनं असंही म्हटलं की, जे वापरकर्ते आवश्यक शिल्लक राखण्यात अयशस्वी होतात, त्यांना प्रथम रिचार्ज करण्यासाठी 15 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जाईल, त्यानंतर त्यांचं सिम कार्ड निष्क्रिय केलं जाईल. तथापि, जर सिम निष्क्रिय झालं तर, वापरकर्त्यांना येणारे कॉल आणि ओटीपीचे संदेश येणार नाहीत. त्यांचा नंबर नवीन वापरकर्त्याला पन्हा दिला जाण्याची शक्यता आहे.
फक्त व्हॉइस रिचार्ज प्लॅन
ट्रायनं टेलिकॉम ऑपरेटरना फक्त व्हॉइस कॉल आणि एसएमएस सेवांसाठी रिचार्ज व्हाउचर ऑफर करणं अनिवार्य केलं आहे. या उपक्रमामुळं डेटाची आवश्यकता नसलेल्या ग्राहकांना डेटा प्लॅनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. ट्रायनं नमूद केलं की काही कंपन्यानी यापूर्वी व्हॉइस आणि एसएमएस पॅक सादर केले. या समस्येचं निराकरण करण्यासाठी, सर्व नवीन पॅक लाँच झाल्यापासून सात दिवसांच्या आत TRAI ला कळवणे अनिवार्य आहे. या निर्णयामुळं ग्रामीण भागातील ग्राहकांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
व्हॉइस-ओन्ली प्रीपेड प्लॅन लाँच : ट्रायच्या निर्देशानंतर, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर्सनी नवीन व्हॉइस-ओन्ली प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. उदाहरणार्थ, जिओने 84 दिवसांच्या वैधतेसह 458 रुपयांचा प्लॅन आणि 1958 रुपयांचा वार्षिक प्लॅन ऑफर केला. दोन्ही प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, मोफत एसएमएस आणि जिओ ॲप्सचा मोफत ॲक्सेस मिळतो, परंतु त्यात मोबाइल डेटाचा समावेश नाही. दरम्यान, एअरटेलनं त्यांच्या विद्यमान व्हॉइस प्लॅनमध्ये सुधारणा केली आहे, त्यांच्या वार्षिक आणि तिमाही पॅकेजेसच्या किमती 40-70 रुपयांनी कमी केल्या आहेत.
हे वाचलंत का :