ठाणे : माजी उपसरपंचानं दहावीच्या अभ्यासा विषयी मार्गदर्शनाच्या बहाण्यानं १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर पडक्या घरात बहाण्याने बोलवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पीडित विद्यार्थिनीनं नराधम माजी उपसरपंचाकडून वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळं कीटकनाशक घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांसह पोक्सो नुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी नराधम माजी उपसरपंचाला बेड्या ठोकल्या आहेत. दयानंद पुडंलिक भोईर असं अटक नराधमाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवीयन विद्यार्थिनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात राहात असून नराधम माजी उपसरपंच हाही पीडितेच्या शेजारी राहातो, तो विवाहित आहे. तर पीडित विद्यार्थिनीचे आई वडील पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागातील एका खासगी कंपनीत हेल्पर म्हणून कार्यरत आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी पीडित विद्यार्थिनीनं राहत्या घरातच कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला मुरबाडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घटनेची माहिती पीडितेच्या ३५ वर्षीय आईला दिली.
त्यानंतर पीडितेची आई रुग्णालयात जाऊन तिला आत्महत्या का करत होती, असं विचारताच तिनं ऑगस्ट महिन्यापासून तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. खळबळजनक बाब म्हणजे पीडितेनं आईला सांगितलं की शेजारी रहाणाऱ्यानं दहावीच्या अभ्यास विषयी मार्गदर्शनच्या बहाण्यानं गावातील एका पडीक घरात बोलवून बलात्कार केल्याचं सांगितलं. मात्र त्यानं धमकी दिल्यानं त्यावेळी घडलेली घटना कोणाला सांगितली नाही. त्यामुळं याचाच फायदा घेऊन नराधम माजी उपसरपंच पीडित विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार करीत होता. याच नराधमाकडून वारंवार होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमुळं त्रास असहाय्य झाल्यानं पीडित मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं.
पीडितेच्या ३५ वर्षीय आईनं मुरबाड पोलीस ठाणे गाठून पीडित मुलीसोबत घडलेल्या घटनेविषयी कथन करताच मुरबाड पोलिसांनी २ डिसेंबरला नराधम माजी उपसरपंचावर भारतीय न्याय संहिता कलम ६४(१) सह पोक्सोचे कलम ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करत नराधम माजी उपसरपंचा शोध घेऊन त्याला अटक केली. अटक आरोपीला न्यायालयात हजर केलं असताना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कामत यांनी दिली आहे. मात्र या घटनेनंतर मुरबाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी नागरिक करीत आहेत. या घटनेचा अधिक तपास मुरबाड पोलीस करीत आहेत.
हेही वाचा...