मुंबई Shreejaya Chavan :ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 12 फेब्रुवारीला पक्षाचा राजीनामा दिला. ते आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांना भाजपा राज्यसभेवर पाठवणार असल्याच्या चर्चा आहे. तर त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे. तसेच राज्यात भाजपाचं सरकार आल्यास श्रीजया यांना मंत्रीपदही मिळण्याची शक्यता आहे.
'भारत जोडो यात्रे' दरम्यान चर्चेत आल्या : श्रीजया चव्हाण ह्या माजी मुख्यमंंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नात आणि अशोक चव्हाण यांच्या जुळ्या मुलींपैकी एक आहेत. त्यांनी मुंबईतून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं असून त्या अशोक चव्हाण यांच्या उत्तराधिकारी मानल्या जातात. राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' पाच दिवस नांदेडमध्ये होती. या दरम्यान श्रीजया चव्हाण चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे 'भावी आमदार' असे पोस्टर्स नांदेड शहरात ठिकठिकाणी झळकले होते. श्रीजया यांनी या यात्रेचं नियोजन केल्याचं बोललं जात होतं. त्यावेळीच त्यांच्या राजकीय पर्वाला सुरुवात झाल्याची चर्चा होती.