नांदेड -राज्यात महायुतीचे संख्याबळ236 हून अधिक असून, भाजपाला 132 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे नांदेडजिल्ह्यात महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आले असले तरी भाजपाचे पाच उमेदवार निवडून आणण्यात अशोक चव्हाण यांना मोठे यश मिळालंय. परंतु तरीही नांदेड जिल्ह्याला एकही मंत्रिपद नसल्याने अशोक चव्हाण यांची ताकद कमी पडली का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला असून, राज्यात एकूण 39 मंत्र्यांचा शपथविधी रविवारी नागपूर झालाय. पण नांदेडला एकही मंत्रिपद मिळालेले नाही.
जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार विजयी :राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपाने राज्यसभेवर नियुक्ती करून खासदार बनवलं. अशोक चव्हाण यांचे समर्थकदेखील भाजपामध्ये सामील झाले. 2024 च्या विधानसभेत नांदेड जिल्ह्यात 9 पैकी 9 उमेदवार विजय झालेत, भाजपाचे पाच आमदार विजय झालेत. अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठा पणाला लावत प्रचार यंत्रणा राबवली आणि महायुतीसह भाजपाचे पाच, शिवसेना शिंदे गटाचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा एक आमदार निवडून आणला तरी देखील नांदेडला एकही मंत्रिपद मिळाले नसल्यानं राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरत आहे.
...तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असता : विशेष म्हणजे यावर आता अशोक चव्हाणांनीही प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन झालेलं आहे. अधिवेशनही सुरू झालंय. मंत्रिमंडळाचा विस्तार सर्वसमावेशक झालेला आहे. अडीच वर्ष काही आमदारांना आणि नंतर अडीच वर्ष काही आमदारांना संधी मिळणार आहे. फडणवीसांच्या नेतृत्वात अजित पवार आणि एकनाथ शिंदे चांगलं काम करतील. परभणी, बीडला संधी मिळाली, आम्हाला त्याचाही आनंद आहे. इतर जिल्ह्यांनाही संधी मिळालाय हवी होती, ती भविष्यात कधी तरी मिळेलच. मी मुख्यमंत्री असतो तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असता, असंही अशोक चव्हाण म्हणालेत.
मंत्रिपदाच्या शर्यतीत कोण?:महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आल्यानंतर नांदेडमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली होती. मुंबई आणि दिल्ली वाऱ्या करत नेतेमंडळी मंत्रिपद आपल्यालाच मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. तीनदा निवडून आलेले मुखेड मतदारसंघाचे डॉ. तुषार राठोड, नायगाव मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राजेश पवार, भोकर मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया अशोक चव्हाण, तर आदिवासीबहुल भागातून दोन वेळेस निवडून आलेले भीमराव केराम, तसेच माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अजितदादा गटात प्रवेश करत लोहा मतदारसंघातून विजय मिळवला.
हेमंत पाटीलही मंत्रिपदासाठी इच्छुक :महायुतीची हे नेतेदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक होते आणि दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत हेमंत पाटील यांची वर्णी लागली. त्यांनी नांदेड उत्तर मतदार संघाची आणि नांदेड दक्षिण मतदारसंघ आणि हादगाव मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवत शिंदे गटाचे तीन उमेदवार निवडून आणले तेदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक होते. पण नांदेड जिल्ह्याच्या पदरी निराशाच आली आहे. जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळालेले नाही खरं तर मराठवाड्यात सहा मंत्रिपदं देण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळालंय, तर परभणीतून मेघना रामप्रसाद बोर्डीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागलीय. संजय शिरसाट, अतुल सावे, बाबासाहेब पाटील यांनासुद्धा मंत्रिपदं मिळालीत.
हेही वाचा -
- "देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही" मंत्रिमंडळ विस्तारावर रामदास आठवले, नवनीत राणा नाराज
- बीड जिल्ह्याला दोन मंत्रिपदं; राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे तर भाजपाकडून पंकजा मुंडेंना मंत्रिपद