अमरावती Govind Fruit Ekadashi : आषाढी एकादशीच्या पर्वावर 'गोविंद फळा'ला अतिशय महत्त्व आहे. जंगलातील वेलीवर वर्षातून एकदाच येणारं गोविंद फळ हे' वाघाटे' या नावानंदेखील ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या प्रत्येक काना-कोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक दिंडीत सहभागी होताता. पंढरपूरच्या दिशेनं निघाले असतानाच पांडुरंगाला हे फळ अर्पण करण्याची प्रथा आहे. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी या फळाची भाजी खाऊन उपवास सोडण्याला महत्त्व आहे. सध्या हे गोविंद फळ बाजारात काही ठिकाणी दिसत आहे. या फळाला धार्मिकबरोबरच आयुर्वैदिक महत्त्वदेखील आहे. कारण, त्यामध्ये औषधी गुण खूप आहेत.
भाजी खाऊन सोडला जातो एकादशीचा उपवास :आषाढी एकादशीच्या पर्वावर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसह राज्यभरात पांडुरंगाचे लाखो भाविक उपवास करतात. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी 'गोविंद फळ' अर्थात वाघाट्याची भाजी खाण्याची जुनी परंपरा आहे. गोविंद फळाची भाजी खाऊन आषाढी एकादशीचा उपवास सोडला जातो. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशीपासून सुमारे आठवडाभर हे फळ बाजारात मिळतं. सध्या आषाढी एकादशीला 14 दिवस आहेत. असे असले तरीही अमरावती शहरातील काही चौकांमध्ये हे फळ आतापासूनच विक्रीसाठी आलं आहे.
जंगलात आढळतात गोविंद फळाचे वेल :गोविंद फळ हे वेलीवर उगवणारं फळ आहे. गोविंद फळाची वेल ही जंगलातील एखाद्या झाडाच्या आश्रयानं वाढते. गोविंद फळाच्या वेलीला वाघाच्या नखासारखे काटे असतात. अनेकदा संपूर्ण वृक्ष या वेलीने व्यापते. यामुळं आता या वेलीला आलेली फळ ही झाडावरच आलीत का? असा भास होतो. अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वरुड आणि मोर्शी तालुक्यात गोविंद फळाची वेल मोठ्या प्रमाणात आहे. यासोबतच मेघाच्या पायथ्याशीदेखील गोविंद वेल आढळते. अमरावती शहरालगत असणाऱ्या पोहरा आणि चिरोडीच्या जंगलात गोविंद फळ अर्थात वाघाटे सध्या मोठ्या प्रमाणात आले असल्याची माहिती विविध वनस्पतीचे जाणकार अनिल चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.