ठाणे Holi Festival 2024 : होळी आणि रंगपंचमीचा सण (Rang Panchami) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. ठाण्याची बाजारपेठांमध्ये तसेच चौका चौकात उभारण्यात आलेल्या स्टॉलवर पिचकारी, मुखवटे, टोप्या, विविध प्रकारचे नैसर्गिक रंग विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रंग खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली आहे. यंदा बाजारपेठत "कलर लगाओ, कलर भगाओ...असा "छू मंतरच्या" जादूच्या कलरची भुरळ बच्चेकंपनीला पडली आहे.
जादूच्या कलरचं 'हे' आहे वैशिष्ट्य: रंगपंचमी सणानिमित्त बाजार रंगीबेरंगी रंगानी फुलुन गेली आहे. जादूच्या कलरनं अनेकांना आकर्षित केलं आहे. जादू कलर घेण्यासाठी चिमुकल्यांसह महिलांना देखील मोह आवरता येत नाही. या जादूच्या कलरचं वैशिष्ट्य म्हणजे हा कलर अंगाला अथवा कपड्याला लावल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच कलर गायब होत असल्यानं सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. अवघ्या पन्नास रुपयामध्ये जादूचा कलर बाजारात उपलब्ध झाला असल्यानं पालकांना देखील मुलांचं लाड पुरवता येणार आहेत. अनेक जणांना रंगपंचमी खेळताना ओला रंग अंगाला लावलेला आवडत नाही. अशांना जादूच्या रंगानं कोरडी रंगपंचमी खेळता येणार आहे. जांभळी नाका, नौपाडा मार्केट तसेच कळव्यातील दुकानांत जादूचे रंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत.