महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रसंतांनी उभारलं गुरूंचं मंदिर, अडकोजी महाराजांची समाधी म्हणजे 'पावर हाऊस' - ADKOJI MAHARAJ TEMPLE

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात येणाऱ्या वरखेड गावात अडकोजी महाराज यांचं मंदिर उभारण्यात आलं. त्यांच्या मंदिरासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

ADKOJI MAHARAJ TEMPLE
अडकोजी महाराजांच्या मंदिरासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2024, 7:21 PM IST

अमरावती :भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हैदराबादच्या निजामशाहीला स्वतंत्र भारतात विलीन करण्यातच नव्हे, तर कोल्हापूर संस्थानाचा स्वतंत्र भारतात समावेश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जपानमध्ये आयोजित धर्म परिषदेत आपल्या विचारांची छाप सोडणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरु अडकोजी महाराज यांनी खऱ्या अर्थानं राष्ट्रसंतांना सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याचा मार्ग दाखवला. ज्या दिवशी जन्म झाला शंभर वर्षानंतर त्याच तारखेला 'संजीवन समाधी' घेणाऱ्या अडकोजी महाराज यांचं मंदिर स्वतः राष्ट्रसंतांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात येणाऱ्या वरखेड गावात उभारलं.

"तुकडोजी महाराजांना सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याची दिव्यदृष्टी देणाऱ्या अडकोजी महाराजांची समाधी ही खऱ्या अर्थानं पावर हाऊस आहे, असं 169 वर्ष आयुष्य जगणारे सिताराम बाबा यांनी म्हटलं होतं," अशी माहिती श्री. अडकोजी महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष अभिजीत बोके यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. अडकोजी महाराज नेमके कोण होते आणि राष्ट्रसंतांनी बांधलेलं अडकोची महाराजांच मंदिर या संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

अडकोजी महाराजांच्या मंदिरासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट (Source - ETV Bharat Reporter)

अडकोजी महाराजांचा परिचय :अडकोजी महाराजांचा जन्म 14 नोव्हेंबर 1821 रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कासार कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव फिसके होतं. आर्वी येथील संत मायाबाई अडकोजी महाराजांच्या आध्यात्मिक गुरु होत्या. अडकोजी महाराजांचा विवाह झाला, मात्र ते प्रापंचिक जीवनात कधी रमले नाही. मौनावस्थेतच ते अधिक काळ राहायचे.

तुकडोजी महाराजांचं खरं नाव 'माणिक' : "तुकडोजी महाराज यांच्या आई त्यांना लहानपणी अडकोजी महाराजांच्या दर्शनासाठी आणायच्या. तुकडोजी महाराजांचं खरं नाव 'माणिक' होतं. मात्र, अडकोजी महाराज यांनी त्यांचं नाव तुकड्या ठेवलं. त्यांना पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावानं ओळखलं गेलं. विशेष म्हणजे तुकडोजी महाराज यांना काव्यरचनेसाठी अडकोजी महाराज यांनीच प्रेरित केलं. तुकडोजी महाराजांप्रमाणेच टाकरखेडा येथील लहानुजी महाराज आणि लगतच्या भारवाडी येथील सत्यदेव महाराजांना देखील अडकुजी महाराज यांचा आशीर्वाद होता. यामुळं तुकडोजी महाराज, लहानोजी महाराज आणि सत्यदेव महाराज हे गुरुबंधू होते," अशी माहिती अभिजीत बोके यांनी दिली.

अडकोजी महाराजांचे सात गुरुबंधू :"संत अडकोजी महाराज यांचे सात गुरुबंधू मानले जातात. स्वतः अडकोजी महाराज आपल्या गुरुबंधूंबाबत सांगत असत. शिर्डीचे संत साईबाबा, शेगावचे संत गजानन महाराज, नागपूरचे ताजुद्दीन बाबा, मुंगसाजी महाराज दादाजी धुनिवाले आणि खटेश्वर माऊली असे अडकुजी महाराजांचे सात बंधू होते," असं देखील अभिजीत बोके यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या सर्व संतांची छायाचित्रं अडकोजी महाराजांच्या मंदिरात आहेत.

जन्मतारखेच्याच दिवशी घेतली समाधी : "अडकोजी महाराज यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1821 रोजी आर्वी येथे झाला. विशेष, म्हणजे तब्बल शंभर वर्षानंतर 14 नोव्हेंबर 1921 रोजी अडकोजी महाराज यांनी वरखेड येथे संजीवन समाधी घेतली. महाराज समाधी घेत आहेत, हे ऐकून तुकडोजी महाराज धावत आलेत. अडकोजी महाराजांच्या नाकापर्यंत पाणी आलं असताना तुकडोजी महाराजांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि अडकोजी महाराजांच्या डोळ्यात एका तेजाचं दर्शन तुकडोजी महाराजांना झालं," असं देखील अभिजीत बोके यांनी सांगितलं.

समाधीस्थळी राष्ट्रसंतांनी उभारलं मंदिर : "अडकोजी महाराजांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली, त्याच ठिकाणी त्यांचं मंदिर उभारण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी घेतला. स्वतः तुकडोजी महाराजांनी मंदिराचं भूमिपूजन करून संपूर्ण मंदिर बांधण्याची जबाबदारी घेतली. या ठिकाणी अतिशय सुंदर असं मंदिर खरपामध्ये उभारण्यात आलं. मंदिराच्या परिसरात भव्य दालन उभारून या ठिकाणी किर्तन आणि भजन व्हावेत, अशी व्यवस्था तुकडोजी महाराजांनी केली. आपल्या गुरूंचं भव्य मंदिर उभारून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आमच्या गावाच्या परिसरात कायम नवचैतन्य निर्माण केलं," असं देखील अभिजीत बोके म्हणाले. विशेष म्हणजे, अडकोजी महाराजांचं हे समाधी मंदिर एक "पावर हाऊस" आहे, असा उल्लेख सिताराम बाबा यांनी केला असल्याचं देखील अभिजीत बोके यांनी सांगितलं.

मंदिरात अध्यात्म केंद्र :"अडकोजी महाराजांचे मंदिर हे अतिशय भव्य आणि सुंदर आहे. मंदिरात सर्वत्र स्वच्छतेला प्राधान्य दिलं जातं. या मंदिरात ज्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राहायचे, त्या ठिकाणी आता अध्यात्म केंद्र निर्माण करण्यात आलं. सकाळी आणि सायंकाळी अनेक जण या ठिकाणी ध्यानधारणा करून मानसिक शांतता आणि समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्या ठिकाणी आंघोळ करायचे त्या ठिकाणी त्यांच्या आंघोळीचा पाठ आणि गंगाळ आज देखील होता त्याच अवस्थेत सुरक्षित ठेवण्यात आला आहे," अशी माहिती देखील अभिजीत बोके यांनी दिली.

नोव्हेंबर महिन्यात असतो उत्सव : "14 नोव्हेंबरला अडकोजी महाराज यांची जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी असते. खरंतर संपूर्ण नोव्हेंबर महिना गावात उत्सव साजरा केला जातो. भजन, कीर्तनात अख्ख गाव तल्लीन होतं. टिपूरवारी पौर्णिमा आणि 14 नोव्हेंबरला गावात सर्वत्र सडा रांगोळी टाकली जाते. प्रत्येकाच्या घरासमोर दिवे लावले जातात. स्मशानभूमी देखील दिव्यांनी उजळून निघते. गावात पालखी काढली जाते, कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावासाठी महाप्रसाद आयोजित केला जातो," असं देखील अभिजीत बोके यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. कडुनिंबाचे झाड न उगवणारं महाराष्ट्रातील अनोखं गाव!
  2. पाववड्याची चव लय न्यारी; गरमागरम देतोय दारोदारी फिरून घरोघरी, शिर्डीच्या पठ्ठ्याची चर्चा - Shirdi Pav Wada Special Story

ABOUT THE AUTHOR

...view details