अमरावती Allegation On Ravi Rana :अमरावती शहरातील बडनेरा ते कोंडेश्वर मंदिर मार्गावर असणाऱ्या सुमारे साडेतीनशे वीटभट्ट्यांवर बुधवारी सकाळी कारवाई करण्यासाठी अनेक बुलडोझर, महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त पोहोचला. ही कारवाई सुरू होताच आमदार रवी राणा यांनी त्यांचा बंगला बांधण्यासाठी आमच्याकडून दोन लाख विटा फुकटात मागितल्या होत्या. त्यापैकी आम्ही 70 हजार विटा दिल्या. आमच्या जवळच्या विटा नेल्या असतानाही आता आमच्यावर अशी कारवाई होत आहे, असा टाहो वीटभट्ट्या चालकांनी फोडला.
प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वीच दिला इशारा :कोंडेश्वर मंदिर मार्गावर गत 40 ते 50 वर्षांपासून बऱ्याच दूर अंतरापर्यंत वीटभट्ट्या आहेत. वीट भट्ट्यांमुळे या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या भागात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. यासह या परिसरात जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आठशे कुटुंबांसाठी नवी वसाहत निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी लवकरच पोलिसांचे कुटुंब राहायला येणार आहेत. अशा परिस्थितीत या भागात शासनाच्या जमिनीवर अनधिकृतपणे वसलेल्या या वीटभट्ट्या त्वरित हटविण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्यावतीने सहा महिन्यांपूर्वीच या भागातील सर्व वीटभट्ट्या चालकांना नोटीस बजावली होती. प्रशासनाच्यावतीने जागा सोडण्याचा इशारा देण्यात आला असताना देखील या भागातील एकही वीटभट्टी चालक येथून हलला नाही.
अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली :आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास वीटभट्ट्या उध्वस्त करण्यासाठी महसूल विभागाचा ताफा कोंडेश्वर मार्गावरील वीटभट्ट्यांच्या परिसरात दाखल झाला. रस्त्याला लागून असणाऱ्या सुधाकर खोब्रागडे यांची वीटभट्टी सर्वांत आधी उध्वस्त करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना वीटभट्ट्या चालकांनी एकच टाहो फोडला. यावेळी एका वीटभट्टी चालकाने एका महसूल अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्यामुळे वातावरण चिघळले. पोलिसांनी अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी वीटभट्ट्या चालकांना 20 मे पर्यंत आपल्या भट्ट्या या शासकीय जागेवरून हटवाव्या, अशी अखेरची सूट दिली.