अमरावती-विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी आक्रमकपणं सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली. खासदार अमोल कोल्हे म्हणाले, " शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल असताना पाठीत खंजीर खुपसण्यात आला. केवळ महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी शिवसेना फोडण्यात आली. पाठीत असा खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. ते अमरावती जिल्ह्यातील वरुड मंगळवारी रात्री येथे मोर्शी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गिरीश कराळे यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, " चाळीस आमदारांना सुरत, गुवाहाटी, गोवा तसंच 'काय झाडी काय डोंगर' महाराष्ट्र आजही विसरलेला नाही. झाडी, डोंगर, हॉटेल ही मजा मारली जात असताना महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडला जात होता. हेदेखील महाराष्ट्र विसरलेला नाही. या गद्दारीसाठी त्यांना पंधरा खोके मिळाले. आज सत्ता टिकेल की नाही ही भीती वाटायला लागल्यामुळे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयात ओके केलं जात आहे. ही वस्तुस्थिती महाराष्ट्राला कळली आहे. यामुळेच आता महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचं सरकार आणायचं ठरवलंय."
खासदार अमोल कोल्हेंचा महायुतीवर हल्लाबोल (Source- ETV Bharat) एखाद्याच्या घराचं छप्पर काढून घ्यायचं. मग त्याला अंथरायला पांघरूण द्यायचं. वरून म्हणायचं बघ आम्ही तुला मदत केली, असा प्रकार खरंतर राज्यातील सरकार करत आहे. दिवाळीत आमच्या बहिणींनी चकल्या, चिवडा आणि शंकरपाळे केले असतील. मात्र खोबऱ्याचा दर सुमारे दीडशे रुपयांनी वाढवला. तेलाचे भाव वाढवलेत, याकडे या माय-माऊलींचं लक्ष गेलं नाही-खासदार अमोल कोल्हे
महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेला काळीमा-पुढे अमोल कोल्हे म्हणाले, "गेल्या दोन-अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकारणाची थट्टा करण्यात आली. सुसंस्कृत म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला उज्वल परंपरा होती. या परंपरेला काळीमा फासण्यात आला. याविषयी स्वाभिमानी आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात राग आहे."
दोन पक्ष फोडल्यावरून टीका- "दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडण्यात आलेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना विकासासाठी फोडण्यात आली, असंच सांगण्यात येतं. हे सर्व विकासासाठी असेल तर इथल्या संत्र्यांना उच्चांकी भाव मिळालेत का ? सोयाबीनला चांगले भाव मिळालेत का ? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का ? तरुणांना रोजगार मिळाला का ? कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत झाली का ? यातलं प्रत्येक उत्तर हे नकारार्थी आहे. दोन पक्ष फोडून महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंक लावून ते सत्तेत जाऊन बसले. ते महाराष्ट्रासाठी नव्हे तर फक्त स्वार्थासाठी जाऊन बसलेत. स्वार्थासाठी सत्तेत जाऊन बसलेल्यांना आता खाली खेचण्याची वेळ आहे," अशा शब्दात खासदार कोल्हे यांनी हल्लाबोल केला.
मतांची झाली कडकी म्हणून सरकारला बहीण झाली लाडकी-लाडकी बहीण योजनेचा महायुतीकडून प्रचार करण्यात येत आहे. त्यावरही खासदार कोल्हे यांनी महायुती सरकावर निशाणा साधला. ते म्हणाले, "माणूस गेला तर त्याच्या तिरडीवर अंथरायला लागणाऱ्या कापडवरसुद्धा जीएसटी वसूल केला जातो. तुमच्या खिशातून सगळं काढून घेतल्यानंतर, बघ मी तुला दिलं बरं का? अशा पद्धतीनं विचारणाऱ्या सरकारच्या योजना या फसव्या आहेत. परीक्षेच्या केवळ दोन दिवस आधी अभ्यास करून पास होता येत नाही. त्या पद्धतीनंच अडीच वर्ष भ्रष्टाचार केल्यानंतर दोन महिन्यांनी योजनांचा पाऊस पाडून सरकार परत येत नाही. याची जाणीव झाल्यामुळे आता "मतांची पडली कडकी म्हणून या सरकारला झाली बहीण लाडकी" अशी टीकादेखील खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारच्या योजनांवर केली.
- राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचा विश्वास खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) नेते अनिल देशमुख आणि माजी मंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख सभेला उपस्थित राहीले.
हेही वाचा-
- नाशिक जिल्ह्यात काही पारंपरिक लढती तर काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढत; जाणून घ्या राजकीय समीकरण
- विधानसभा निवडणूक 2024 : पृथ्वीराज चव्हाणांच्या मैदानात अमित शाह करणार 'बॅटींग'; अरविंद केजरीवाल देणार उत्तर?