पुणे : देशात लवकरच लोकसभा निवडणूक होणार असताना प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर अमित ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, " माझी निवडणूक लढवण्याची कोणतीही इच्छा नाही. पण, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर म्हटलं तर मी राज्यातून कोठूनही निवडणूक लढविण्यास तयार आहे," ते यावेळी म्हणाले आहेत.
कोणतीही जबाबदारी पार पाडणार : पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला. पुणे लोकसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे. याबाबत अमित ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. परंतु, राज ठाकरेंनी जर मला कुठलीही जबाबदारी दिली तर मी ती यशस्वी पार पाडेल. मला नगरसेवक, सरपंच पदासाठी जबाबदारी दिली तरी ती व्यवस्थित पार पाडेल," असंही अमित यावेळी म्हणाले आहेत.
हे खूपच दुर्दैवी : "माझं मूळ उद्दिष्ट हे विद्यार्थी सेनेचा पहिला कार्यक्रम म्हणून राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात एक युनिट पाहिजे होते. मी प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनीपर्यंत पोहचू शकतो. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत. सध्या आमची सत्ता नसल्यानं आम्ही ते प्रश्न सोडवू शकत नाहीत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत जर आपण मेसबाबत भांडण करत असू, तर हे खूपच दुर्दैवी आहे, असंही अमित यावेळी म्हणाले.
एकही केस झालेली नाही : "विशाखा समिती नेमण्यात आली आहे. ती फक्त विद्यापीठातच ॲक्टिव्ह आहे. बाकी कुठल्याही महाविद्यालयात ही समिती ॲक्टीव्ह नाही. या समितीत फक्त शिक्षिका असून विद्यार्थिनींना घेतल गेलेलं नाही. उपकेंद्र बांधूनही ते सुरू केलेलं नाही. असे अनेक विषय आज कुलगुरू यांच्यासमोर मांडण्यात आले. यावेळी कुलगुरुंनी काही मागण्याही मान्य केल्या आहेत," अशी माहिती अमित ठाकरेंनी दिली. पुढे ते म्हणाले, "मी राजकारणात आल्यापासून एकही राजकीय केस माझ्यावर झालेली नाही. मी माझ्या पहिल्या राजकीय केसची वाट बघत आहे. ती पुण्यातून मिळाली तर मला खूपच आनंद होईल" असही ते म्हणाले.