ठाणे Ambernath Crime News :चोरी करण्यासाठी आले या संशयातून दोन तरुणाची जमावानं बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ पूर्वेतील दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा कॉलनी येथे घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या जमावापैकी 20 जणांना संशियत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.
20 जणांना घेतलं ताब्यात :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज परमार आणि सूरज उर्फ भैय्या निर्मल कोरी अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे दोघंही अंबरनाथ शहरातील प्रकाशनगर आणि शिवमंदिर परिसरात राहत होते. अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात आज (17 फेब्रुवारी) सकाळी या दोघांचे मृतदेह आढळून आले. याविषयी माहिती मिळताच तात्काळ शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही तरुणांना चोर समजत जमावानं मारहाण करून हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. तसंच त्यादृष्टीनं शिवाजीनगर पोलीस तपास करत असून आतापर्यत 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसंच दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.