पालघर Ambadas Danve News: मराठा आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठीचा लढा यामधील भाजपाची भूमिका असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. त्याचबरोबर राज्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत आठ दिवसांत निर्णय होऊन उमेदवार यादी ही जाहीर होईल, असं त्यांनी सांगितलं.
- मविआच्या जागावाटपावर भाष्य करण्यास नकार :ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीत किती जागा मिळतील, याबाबत भाष्य करण्यास दानवे यांनी नकार दिला. हा अधिकार पक्षांच्या नेत्यांचा आहे. ते जागा वाटपाचा निर्णय घेतील, असं अंबादास दानवे त्यांनी सांगितलं.
‘शासन आपल्या दारी, जनता चकरा मारी’ :‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राज्य सरकार वेगवेगळ्या जिल्ह्यात राबवत असताना आपल्याला जनता दरबार घेण्याची गरज का भासली? या प्रश्नावर अंबादास दानवे म्हणाले, की "‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून लोकांना निर्णय मिळत नाहीत. लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. चार-पाच वर्ष साधे दाखल्यांचे आणि अन्य प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’ नसून ‘जनता शासनाच्या दारी’ फेरफटके मारत आहेत. शासन काय कामाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भूसंपादनाचे पैसे लोकांना मिळत नाहीत. साधे प्रवेशपत्रासाठी दाखले मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. सरकार कुणाच्या दारी असा प्रश्न उपस्थित झाल्यानं आम्ही जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेतून जनता दरबार घेत आहोत. शिवसेनेची ही भूमिका आहे".
- पालघरचा खासदार शिवसेनेचाच : "पालघर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा असून तेथे शिवसेनेचाच खासदार होईल", असा आत्मविश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर "आधुनिकीकरण करताना मच्छीमार किंवा शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर तो अन्याय सहन केला जाणार नाही", असा इशारा त्यांनी दिला.