मुंबई-बदलापूर येथील चिमुकलींसोबत झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेसंदर्भात केलेल्या वक्तव्यांबद्दल सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलीय. तुषार आढाव यांनी एडवोकेट अमित कटारनवरे यांच्यामार्फत ही नोटीस पाठवलीय. या नोटिसीचे उत्तर दोन दिवसांत देण्याची मागणी नोटिशीमध्ये करण्यात आलीय. अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर बनावट असल्याने त्या प्रकरणातील सहभागी पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवावा आणि त्यांच्या विरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिलेत. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी फॉरेन्सिकच्या अहवालाचा दाखला देत सांगितले होते की, आरोपी अक्षय शिंदेचा ज्यावेळी एन्काऊंटर झाला, त्यावेळी पाऊस पडत होता. त्यामुळे अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे आढळून आले नाहीत. आरोपी अक्षय शिंदेनं लहान मुलींवर बलात्कार केलाय, असे वक्तव्य कदम यांनी केले होते.
...तर तपास यंत्रणेवर प्रभाव पडू शकतो : योगेश कदम राज्याचे गृहराज्यमंत्री असून, त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलीय. या प्रकरणातील फॉरेन्सिक अहवालातील माहिती जाहीर केल्याने त्याचा तपास यंत्रणेवर प्रभाव पडू शकतो. तसेच जोपर्यंत एखादं न्यायालय आरोपीला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत सदर आरोपीस निर्दोष मानले जाईल, हा न्यायाचा मूलभूत सिद्धांत मंत्र्यांना माहिती असतानादेखील त्यांनी हे वक्तव्य केलंय. एखाद्या आरोपीला दोषी ठरवण्याचा अधिकार फक्त सक्षम न्यायालयाला असताना न्यायालयीन अधिकार क्षेत्रात तुमच्या वक्तव्यामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. अक्षय शिंदेनं बलात्कार केल्याचे घोषित करून सदर प्रकरण तपासाधीन व न्यायप्रविष्ट असताना आपण सदरच्या गोपनीय अहवालातील मुद्दे सार्वजनिक केलेत. त्यामुळे आपण घेतलेल्या गोपनीयतेचा तसेच शपथीचा भंग करून न्यायालयाचा अवमान करून गृह राज्यमंत्री या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत आणि तुम्हाला मंत्रिपदावरून दूर करण्याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आलाय.
दोन दिवसांत याबाबतचा खुलासा करा :त्यामुळे अक्षय शिंदेचा खून झालाय, त्या दिवशी पाऊस पडत असल्याबाबत आपल्याकडे नेमके कोणते पुरावे आहेत, याबाबतचा खुलासा करून सदरची माहिती लोकांसमोर द्यावी. अन्यथा दोन दिवसांत याबाबतचा खुलासा न झाल्यास सदर कृत्य करून आरोपींना कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्यासाठी तपास यंत्रणेवर प्रभाव टाकत असल्याचे गृहीत धरून आणि न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करून न्यायालयाचा अवमान करत असल्याचे गृहीत धरून आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिशीद्वारे देण्यात आलाय.