मुंबई :मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर निशाना साधला. त्यामुळे छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये वाद टोकाला गेल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र छगन भुजबळ यांची योग्यवेळी भेट घेण्यात येईल, असं राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी दिल्लीत स्पष्ट केलं. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दुसरीकडं छगन भुजबळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला आहे. कोणीही कोणतंही बॅनर लावू नये, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
योग्य वेळी छगन भुजबळ यांची भेट घेण्यात येईल :राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी दिल्लीत बोलताना राष्ट्रवादीतील घडामोडींवर भाष्य केलं. अजित पवार यांची प्रकृती ठिक नसल्यानं त्यांनी अधिवेशनाला जाणं टाळलं. मात्र ते लवकरच अधिवेशनाला उपस्थित राहतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीनाट्याबाबत त्यांना विचारलं असता, त्यांनी यावरही भाष्य केलं. "छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. योग्यवेळी अजित पवार त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करतील," असं त्यांनी यावेळी सांगितलं.