मुंबई : राष्ट्रवादी पक्षात बंड करुन अजित पवार महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. मात्र राष्ट्रवादी पक्षातील बंडाच्या अगोदरच्या घडामोडीबाबत अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबाबत गौप्यस्फोट केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षात बोलणी करण्यासाठी शरद पवार, अमित शाह, गौतम अदानी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात 5 वर्षापूर्वी बैठक पार पडली होती, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा गौप्यस्फोट केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भाजपा, राष्ट्रवादीतील बैठकीत शरद पवार आणि गौतम अदानी :विधानसभा निवडणूक 2019 नंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरू होता. या वादातच देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी उरकला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मोठी खळबळ उडवून दिली. मात्र हे सरकार काही तासाच्या आत कोसळलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडी स्थापन करत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं. आपण घेतलेली शपथ ही शरद पवार यांच्या संमतीनंच घेतल्याचा दावा अजित पवार यांनी केला. एका बड्या उद्योगपतीच्या घरी झालेल्या बैठकीनंतर हा शपथविधी झाल्याचं तेव्हा अजित पवार यांनी सांगितलं. त्याचा खुलासा आता अजित पवार यांनी दिलेल्या मुलाखतीत केला. "भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यातील बोलणीला अमित शाह, शरद पवार, प्रफुल पटेल आणि उद्योगपती गौतम अदानी होते," असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी या मुलाखतीत केला.
पहाटेच्या शपथविधीचे आरोप माझ्या डोक्यावर :"पहाटे झालेला शपथविधी हा उद्योगपतींच्या घरी झालेल्या चर्चेतील बोलण्यानुसारचं झाला. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी भूमिका बदलली. या शपथविधीचा आरोप माझ्यावर ढकलण्यात आला. इतरांना सेफ करण्यासाठी हा आरोप मी माझ्यावर घेतला," असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र अगोदर तुम्हाला शपथविधी घ्यायला सांगून मग शरद पवार यांनी पलटी का मारली, याबाबत अजित पवार यांना यावेळी मुलाखतकारांनी विचारलं असता, त्यांनी याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं. "शरद पवार यांच्या मनात काय सुरू आहे, याबाबत माझ्या काकीलाही माहिती नसते, सुप्रिया सुळे यांनाही काहीच सांगता येत नाही," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
विरोधकांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर मोठा वाद उफाळून आला. त्यानंतर राष्ट्रवादीत बंड करुन अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली. मात्र आता पहाटेच्या शपथविधीवर त्यांनी या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले. राष्ट्रवादी आणि भाजपाच्या बोलणीत उद्योगपती गौतम अदानी असल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी आणि भाजपाच्या बोलणीत उद्योगपती गौतम अदानीचं काय काम, असा सवाल विरोधकांनी अजित पवार यांना विचारला आहे. उबाठा पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उद्योगपती गौतम अदानीवरुन सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. "राष्ट्रवादी आणि भाजपा यांची सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती का, भाजपाला सत्तेत आणण्यासाठी उद्योगपती इतक्या तत्परतेनं का काम करत आहेत, बोल धारावी बोल," असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. तर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी, "धारावी आणि इतर प्रकल्प मिळवेत म्हणून महाविकास आघाडी सरकार उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठीच अस्थिर करण्यात आलं. हे महाराष्ट्र सरकार नाही, तर अदानी सरकार आहे," असा हल्लाबोल केला.
हेही वाचा :
- शरद पवार यांचे संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत, अजित पवारांबाबत म्हणाले, "बारामतीत.."
- बारामतीत दोन पाडवा; दोन्ही पवारांकडे गर्दीच गर्दी, विधानसभेआधी दोन्ही पवारांनी दाखवून दिली ताकद
- घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयानं अजित पवारांना 'हे' दिले निर्देश