मुंबई Ashok Chavan Join Bjp : माझ्या राजकीय आयुष्याची ही नवी सुरूवात आहे. मी कालपर्यंत काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे. आता भाजपामध्येही मी प्रामाणीकपणेच काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर दिली आहे. यावेळी त्यांनी सवईप्रमाणे आशिष शेलार यांचा उल्लेख मुंबई भाजपा अध्यक्ष असा करण्या ऐवजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष असा केला. त्यावेळी एकच हशा पिकला. मात्र लगेच दुरुस्ती करत त्यांनी शेलार यांचा उल्लेख भाजपा अध्यक्ष असा केला. यावेळी आदर्श घोटाळ्याबाबत विचारलं असता चव्हाण म्हणाले, या प्रकरणात आमच्या बाजूने निकाल लागला आहे. तसंच, त्यामध्ये बऱ्याच याचिका दाखल आहेत. मात्र, या प्रकरणात मी बरंच काही सहन केलंय असंही ते यावेळी म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही आज भाजपात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्याची दाट शक्यता असल्यानं हा प्रवेश छोटेखानी पद्धतीने झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रसंगी बोलताना अशोक चव्हाण यांनी हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्या येण्यानं भाजपा पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.
योग्यवेळी ती मदत घेतली जाईल-याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भाजपामध्ये अशोक चव्हाण, अमर राजूरकर यांचे मन:पूर्वक स्वागत करतो. यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात भाजपाची व युती पक्षाची शक्ती वाढली आहे. मोदी यांनी भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वास नेण्याचं काम केलं. त्यामुळे देशातील प्रत्येकाला असे वाटतं की, आपण मोदींजीसोबत काम करावं. देशाला पुढे नेण्याचं काम पंतप्रधान मोदी करत आहेत." अशोक चव्हाण यांनी पक्षात प्रवेश करताना कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. फक्त विकासाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या प्रवेशानं राज्यातील भाजप व युती पक्षाची ताकद ही नक्की वाढणार आहे. अशोक चव्हाण यांची मदत कधी कशी घ्यायची, हे आम्हाला पक्के ठाऊक आहे. योग्यवेळी ती मदत घेतली जाईल. येत्या काही काळात अजूनही मोठे पक्ष प्रवेश भाजपामध्ये होणार आहेत," असेही फडणवीस म्हणाले.
सभागृहाच्या बाहेर आम्ही सर्व एक-भाजपामध्ये पक्ष प्रवेश झाल्यानंतर यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, "जिथे मी राहिलो आहे, तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. इथेही मी प्रामाणिकपणे काम करेन. कुठलेही दोषारोप मी कोणावर करणार नाही. सबका साथ सबका विकास, ही प्रधानमंत्री यांची भूमिका आहे. या भूमिकेने मी प्रेरित झालो आहे. जे चांगले ते चांगले आहे. विरोधी पक्षात असताना सुद्धा आम्ही जाणूनबुजून कधी मोदींवर टीका केली नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळात अनेक दिग्गज आम्ही पाहिले आहेत. सभागृहाच्या बाहेर आम्ही सर्व एक असतो. तसेच जो आदेश पक्ष मला देईल ते काम मी करेन. भाजपमध्ये पक्ष प्रवेश करताना कुठलीही मागणी मी केलेली नाही. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. मी या पक्षात नवीन आहे, म्हणून मी आज काही जास्त बोलणार नाही.
वाद घालण्यात काही अर्थ नाही-गेल्या ३८ वर्षाचा राजकीय प्रवासात आज मी नव्याने सुरुवात करत आहे. देशाच्या विकासात आपली सुद्धा महत्त्वाची भूमिका असावी, या इच्छेनं मी भाजपामध्ये प्रवेश करत आहे. मी कोणालाही माझ्यासोबत बोलवलं नाही. हा निर्णय माझ्यासाठी इतका सोपा नव्हता. माझ्यासाठी, राज्यासाठी, माझ्या मतदारसंघासाठी महत्त्वाचा निर्णय होता. पक्षानं मला भरपूर दिले आहे. पण मीसुद्धा पक्षाला भरपूर दिलं आहे. म्हणून यावर वाद घालण्यात काही अर्थ नाही," असेही चव्हाण म्हणाले.