मुंबई - महायुतीचे सरकार, केंद्र सरकार आणि मुंबई पालिका प्रशासन यांचा भोंगळ आणि भ्रष्ट कारभार सुरू आहे. मुलुंडमधील प्रदर्शन कार्य योजने (PAP)चा प्रकल्प सरकारने अजून रद्द केलेला नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. खरं तर भाजपाचे नेते मिहीर कोटेचा हा प्रकल्प रद्द होणार असल्याचं सांगत आहेत. सरकार अनेक प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहे. महायुतीचे सरकार महाराष्ट्राची आणि मुंबईची लूट करीत असून, मुंबईतील अनेक जमिनी अदानींच्या घशात घालण्याचे काम हे सरकार करीत आहे, असा घणाघाती टोला शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केला. आज त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
धारावीची जमीन अदानींच्या घशात :पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, धारावी प्रकल्पातील 70 टक्के जमीन ही पालिकेची आहे. त्यामुळं 5 हजार कोटींचा लँड प्रीमियम मुंबई महापालिकेला मिळाला पाहिजे. यासह म्हाडालाही 1 ते 2 हजार कोटींचा लँड प्रीमियम मिळाला पाहिजे. मात्र असं होताना पाहायला मिळत नाही. हे पैसे अदानींकडून दिले जात नाही. अदानी स्वतःकडे पैसे ठेवताहेत. सरकारचा भ्रष्ट कारभार सुरू आहे. हे सरकार धारावीची जमीन अदानींच्या घशात घालण्याच्या तयारीत आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी सरकारवर केली.
लँड प्रीमियम का घेतला नाही? : 20 दिवसांत एमएमआरडीएने 15 हजार कोटींचे टेंडर काढले. यात कॉन्ट्रॅक्टरची 40 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. आता कॉन्ट्रॅक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सर्वत्र भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभार सुरू आहे. धारावी प्रकल्पातील लँड प्रीमियम मुंबई पालिका आयुक्तांनी का घेतला नाही? हा लँड प्रीमियम मुंबई पालिकेच्या हक्काचा आहे. परंतु त्यांनी का घेतला नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुंबई पालिका आयुक्त यांच्यावर टीका केली. यासाठीच मागील काही वर्षांपासून तुम्ही मुंबई पालिकेची निवडणूक घेतली नाही का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. मिंधे सरकारचे नगरविकास खाते हे पालिकेची लूट करीत आहे. याला जबाबदार म्हणजे पालिका आयुक्तसुद्धा आहेत, असा निशाणा आदित्य ठाकरेंनी राज्य सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनावर साधलाय.
समोरासमोर या... :महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेवढी विकासकामं झाली नव्हती, तेवढी महायुती सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामं झालेली आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, विकासकामांबद्दल बोलण्याची आमची तयारी आहे, पण तुम्ही समोरासमोर या, चर्चेला बसा, असं प्रतिआव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलंय. दरम्यान, वांद्रे पूर्व शासकीय वसाहतीतील नागरिक आपल्या हक्काच्या घरासाठी उपोषणाला बसले आहेत. तिकडे जाण्यास सरकारला वेळ नाही. मात्र आमचे सरकार आल्यानंतर तेथील रहिवाशांना आपल्या हक्काचे घर मिळवून देणार, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
विकासकामांसंदर्भात समोरासमोर या अन् चर्चा करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान - ADITYA THACKERAY
विकासकामांबद्दल बोलण्याची आमची तयारी आहे, पण तुम्ही समोरासमोर या, चर्चेला बसा, असं प्रतिआव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलंय.
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान (ETV Bharat File Photo)
Published : Oct 7, 2024, 8:26 PM IST