छत्रपती संभाजीनगर Aditya Thackeray On Government : आम्ही शक्ती कायदा 2021 मध्ये राज्यपालांकडं पाठवला, त्यांनी केंद्राकडं पाठवला मात्र मंजूर केला नाही. महिलांना शक्ती देणारा कायदा आणला नाही, अन् आता मात्र सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, अशी टीका ठाकरे गटाचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली. निवडणूक आली की असे खेळ केले जातात. कुठलीही निवडणूक जवळ नसताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांना मोठी मदत दिल्याची घोषणा केली, मात्र मदतीचे 15 रुपये, 20 रुपये आले, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाले :आता महिलांना किती मिळणार बघा. या दोन वर्षात महिलांची आठवण नाही आली, आज लाडकी बहीण योजना सरकारनं आणली. 10 वर्षांपूर्वी 15 लाखांवर देऊ बोलत होते, आज दीड हजारावर आले, हे खोटे आहेत. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, त्यांना अतिरेकी म्हणाले. आता म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, असं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
मशाल उजेड आणेल :जर्मनीमध्ये नौकरी देणार म्हणे, युवकांना काही गुवाहाटी इथं जायचं नाहीये. मात्र माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे. रोजगार मिळाला पाहिजे, मी हक्कासाठी लढणारंच. मात्र राज्यात सध्या माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना चालू आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी संत एकनाथ रंग मंदिर इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली. "अयोध्या सारख्या ठिकाणी हरले, कारण त्यांनी स्थानिकांना डावललं. तिथले पुजारी देखील गुजरातमधून आणण्याचा प्रयत्न आहे. परिक्षांमधील घोटाळे आहेत, कितीवेळा आंदोलन करायचं, एमपीएससी म्हणते आम्ही वेळ बदलणार नाही. ही निवडणूक थोडी आहे, ज्याचा वेळ बदलणार नाही. पोलीस भरतीत लाखो मुलं आले, त्यांची सोय नाही. किती जणांना नोकरी मिळेल, कुठं मिळेल, त्यांची व्यवस्था कशी असेल, माहिती नाही. कामगार कायदे बदलायचे आहेत. आपल्या मुलांना रस्त्यावर दगडफेक करण्यासाठी वापरणार आहेत का?" असा संतप्त प्रश्न उपस्थितीत करत "या अंधारात मशाल उजेड आणू शकते," असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.