मुंबई Ladki Bahin Yojana :महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' या योजनेचा तिसरा हप्ता या आठवड्यात यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं या आठवड्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार असल्यानं, महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते ऑगस्ट महिन्यात आलेत. परंतु, कित्येक महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्यानं ऑगस्ट महिन्यात या योजनेचा त्यांना लाभ घेता आला नाही. पण ज्यांनी सप्टेंबरपूर्वी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांचे आता आधार कार्ड लिंक झाले आहे. अशा महिलांनाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण तीन महिन्याचे 4500 रुपये लवकरच खात्यात यायला सुरुवात होणार असल्याची माहिती, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
योजनेचा महायुती सरकारला फायदा :एकिकडं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणल्यामुळं विरोधकांकडून टीका केली जात आहे. तर दुसरीकडं या योजनेचा महायुती सरकारला फायदा होईल. महिलांच्या मतामुळं सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. सप्टेंबर महिन्यात ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यांचे पैसे या महिन्यात मिळणार की, पुढील महिन्यात मिळणार? याबाबत महिला वर्गात संभ्रम आहे. तर अद्यापपर्यंत किती कोटी महिलांनी अर्ज दाखल केलेत? आणि 2 महिन्यात या योजनेच्या माध्यमातून किती कोटी रुपये सरकारने महिलांच्या खात्यात जमा केले? असे अनेक प्रश्नही या निमित्ताने विचारले जात आहेत.
तरीही याच महिन्यात पैसे मिळणार : गेल्या महिन्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले. मात्र, त्यावेळी अनेक महिलांनी अर्ज दाखल करूनही त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसल्यामुळं त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळं अनेक महिलांचा भ्रम निरास झाला होता. यानंतर बँकेत आधार लिंक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळं ज्या महिलांना पहिले दोन हप्ते मिळाले नाहीत. त्या महिला आपल्या खात्याकडं डोळे लावून बसल्या आहेत. मुख्य म्हणजे ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये नवीन अर्ज दाखल केले आहेत. त्यांनाही याच महिन्यात पैसे मिळणार आहेत. परंतु, त्यांना गेल्या दोन महिन्यांचे पैसे मिळणार नाहीत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे. दरम्यान, ज्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा पहिल्यांदाच लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. त्यामुळं महिलांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळाला असून, महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे.