अमरावती : इंग्रजी नववर्षाच्या स्वागतासाठी हुल्लडबाजी किंवा दारू पिऊन धिंगाणा न घालता सर्वांनी एकत्रित येऊन आनंदानं नव्या वर्षाची सुरुवात करावी असा संदेश देत रामस्नेही संप्रदायाच्या वतीनं देण्यात आला. जिल्ह्यातील लालखेड या ठिकाणी रामस्नेही संप्रदायाच्या वतीनं (Ramsnehi Sampraday) विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 31 डिसेंबर आणि एक जानेवारीला राज्यातील विविध जिल्ह्यांसह गुजरात आणि राजस्थान मधील अनेक युवक आणि त्यांचे पालक या सोहळ्यानिमित्त एकत्रित आले होते.
पंधरा वर्षांपासून व्यसनमुक्ती अभियान : रामस्नेही संप्रदाय अंतर्गत रामस्नेही युवक मंडळाच्या वतीनं गत पंधरा वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या हिवरा या संप्रदायाच्या प्रमुख केंद्राच्या ठिकाणी व्यसनमुक्ती अभियान राबवलं जातं. यावर्षी पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्यात लालखेड येथे संत मामाश्री आणि किसनदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आलं. अमरावती जिल्ह्यासह यवतमाळ, वाशिम, नांदेड, सोलापूर यासह गुजरात आणि राजस्थानमधील काही जिल्ह्यातून युवक या अभियानात सहभागी झाले होते. गत पंधरा वर्षांपासून व्यसनाधीन युवकांना व्यसनमुक्त करण्यासोबतच समाजातील कुठल्याही युवकांना व्यसन लागू नये यासाठी रामस्नेही युवा मंडळाच्यावतीनं विशेष कार्यक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती, लालखेड येथील अभियानाचे समन्वयक तुळशीराम चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
अध्यात्म आणि विज्ञानाचा संयोग: रामस्नेही संप्रदाय हा पुरातन संप्रदाय असून प्रभू श्रीरामाच्या मूर्ती पूजेपेक्षा श्री रामामध्ये असणारे गुण यांना महत्त्व देतो. महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थानमध्ये हा संप्रदाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्णतः विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून नव्या पिढीला जगण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणं हा या संप्रदायाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानामध्ये एका युवकाला व्यसनमुक्त जीवनाचं महत्त्व पटलं तर तो या अभियानासोबत आणखी चार मित्रांना जोडतो, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे कोणाकडूनही साधा रुपया देखील घेतला जात नाही. केवळ समाज हा व्यसनमुक्त व्हावा हाच या अभियाना मागचा उद्देश आहे अशी माहिती शिबिराचे संयोजक अंकुश पहुरकर यांनी दिली.