मुंबई Renuka Shahane On Marathi Artist: दुसरीकडे मराठी भाषेवर अन्याय होत असताना मराठी कलाकार मात्र चिडीचूप शांत बसले आहेत. कुठलंही मत नाही, भूमिका नाही, साधं ट्विटही नाही. यामुळं कलाकारांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. यानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला जवळपास 64 वर्ष पूर्ण होत असताना महाराष्ट्रात आणि मुंबईत अजूनही मराठी भाषेवर अन्याय होणं, मराठी उमेदवाराला नोकरीसाठी डावलणं किंवा मराठी कुटुंबाला घर न देणं आदी प्रकार वारंवार घडत आहेत. या आधीही मुंबईत असे कित्येकवेळा प्रकार घडले आहेत. हे पुन्हा एकदा घडत असल्यामुळे ही एक शोकांतिका आणि दुर्दैव आहे. असा संताप मराठी माणसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मोजकेच कलाकार समोर :मुंबईत मराठी विरोधी घडलेल्या घटनानंतर जेव्हा माध्यमातील प्रतिनिधींनी फोन करून याबद्दल कलाकारांना मत विचारलं तेव्हा मोजक्याच कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र अनेक कलाकारांनी माहिती पाठवा, माहिती घेऊन सांगतो, परत फोन करतो, आता बिझी आहे नंतर फोन करा अशी कारणे देत वेळ मारून नेली. एकीकडे स्वतःहून भूमिका घ्यायची नाही. पण ज्या रेणुका शहाणे यांनी भूमिका घेतली, किमान त्यांच्या पाठीशी उभे राहणे किंवा त्यांचे कौतुक करणे हे मराठी कलाकारांकडून अपेक्षित होतं; मात्र दुर्दैवाने हेसुद्धा होताना दिसले नाही. मोजक्याच कलाकारांनी शहाणे यांना समर्थक देत पाठिंबा दिला आहे. यामध्ये अभिनेत्री आदिती सारंगधर, अभिनेता अतुल तोडणकर, शुभांगी गोखले, चिन्मय सुर्वे, मंगेश देसाई, नंदेश उमप आदी कलाकारांनी पाठिंबा दिला आहे; मात्र मराठीतील अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांनी याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. यामुळं लोकांमधूनही संताप व्यक्त करण्यात येत असून, जेव्हा मराठी भाषेला, मराठी माणसाला या कलावंताची गरज असते तेव्हा हे शांत कसे बसतात? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मग यांचे चित्रपट आम्ही का पाहावे? :अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी परखड भूमिका घेत मतदारांना आवाहन केलं. त्या पद्धतीने अन्य कलाकारांनी काय केले नाही? कलाकारांनी मूग गिळून गप्प का आहेत? शांत का आहेत? असा प्रश्न मुंबईकर विचारताहेत. 'मग अशा कलाकारांचे आम्ही पैसे काढून थेटअरमध्ये सिनेमा, चित्रपट का पाहिला जावा? असं मुलुंडमध्ये राहणारे आप्पा वाघमारे यांनी म्हटलं आहे' तर 'जेव्हा मराठी माणसांवर. मराठी भाषेवर अन्याय होतो, तेव्हा विविध क्षेत्रातील लोकांनी यावर भूमिका घेतली पाहिजे आणि स्वाभाविकपणे सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यावर मत मांडलं पाहिजे, असं फोर्टमध्ये राहणारे मंगेश कांबळे यांनी म्हटलं आहे'. दुसरीकडे 'काही कलावंत हे आपले नुकसान होईल. आपण बोलल्यामुळे आपल्याला कोणी इव्हेंट देणार नाही किंवा त्याचा फटका आपल्या सिनेमाना बसेल, आपले नुकसान होईल असं वाटत असल्यामुळं संकुचित वृत्ती बाळगून आपले भले आणि आपले काम भले असं म्हणताहेत, असं अंधेरीत राहणारे संदेश खेडेकर यांनी म्हटलं आहे. 'एकीकडे मराठी माणसांनी थेटअरमध्ये चित्रपट पाहण्यास यावा अशी अपेक्षा मराठी कलाकार बाळगत असताना, जेव्हा मराठी भाषेवर अन्याय होतो. तेव्हा मात्र हे मराठी कलाकार शांत का राहतात? हाच खरा प्रश्न आहे. मग पैसे मोजून यांचे चित्रपट मराठी माणसाने कशासाठी बघायला जावे, असं खेदानं म्हटलं जात आहे.
म्हणून कलाकार शांत? :आपण जर एखाद्या विषयी भूमिका घेतली आणि समाजात मत मांडले, तर त्याला जसा पाठिंबा मिळेल तसा विरोध होण्याचीही शक्यता असते आणि आपण एक कलाकार आहोत. कोणा एकाची बाजू घेणे हे आपल्यासाठी योग्य नाही. याचा फटका आपला सिनेमावर बसू शकतो. परिणामी आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. ही भावना कलाकारांमध्ये असल्यामुळे ते कोणत्याही विषयावरती उघडपणे मत मांडू शकत नाहीत. त्यांना काही मर्यादा आहेत, म्हणून ते शांत बसतात का? असा सवालही विचारला जात आहे.