मुंबई -प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी जीवघेणा हल्ला झालाय. या हल्ल्यानंतर सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. सध्या सैफ अली खानची प्रकृती ठीक असून, त्याला एक दिवस अंडर ऑब्झर्वेशनसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. पण सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर विरोधकांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहविभागावर टीका केलीय. तर आरोपी चोरीच्या हेतूने सैफ अली खानच्या घरात घुसला होता, अशी माहिती झोन 9 चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी दिलीय.
आरोपीला लवकरच पकडणार :दरम्यान, सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर यावर प्रतिक्रिया उमटत असताना आता लवकरच आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात आहे, यासाठी मुंबईत विविध ठिकाणी 10 पथकं तैनात करण्यात आलीत, सैफ अली खानच्या घरी ज्या दोन मोलकरिणी काम करत होत्या, त्यांनाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ज्या पद्धतीने आरोपी सैफ अली खानच्या यांच्या घरात घुसला, त्याचे काही सीसीटीव्ही आम्हाला प्राप्त झालेत आणि त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पुढील तपास सुरू असून, पोलीस याबाबत अधिक चौकशी करताहेत. आरोपीला लवकरच आम्ही पकडू, असंही झोन 9 चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सांगितलंय.