मुंबई : आज विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू झालं असून या अधिवेशनात तब्बल 170 आमदारांचा शपथविधी पार पडला. या आमदारांमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीही शपथ घेतली आहे. "उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या धर्मांध राजकारणाला कंटाळून आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत," असं अबू आझमी यांनी यावेळी स्पष्ट केलं. अबू आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानं हा महाविकास आघाडीला मोठा धक्का असल्याचं मानलं जातय.
अबू आझमी काय म्हणाले? :कोणत्याही प्रकारचा समन्वय महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीत पाहायला मिळाल नाही. कोणत्याही निवडणुकीला आघाडी म्हणून सामोरं जात असताना एकवाक्यता गरजेची आहे. कोणत्याही पक्षाचा नेता निवडणूक लढत असेल तर त्याला आपला नेता-उमेदवार समजलं गेलं पाहिजे. पण कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता, असं अबू आझमी म्हणाले.
प्रतिक्रिया देताना आमदार रईस शेख (ETV Bharat Reporter) ... यामुळं महाविकास आघाडीला अपयश : यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. यावर अबू आझमी म्हणाले, "महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांच्या मंचावर प्रचारासाठी दिसले नाहीत. खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळालं. जागा वाटपावेळी रस्सीखेच पाहायला मिळाली. यामुळं महाविकास आघाडीचा पराभव झाला."
शिवसेना उबाठाच्या भूमिकेमुळे 'सपा' नाराज : राज्यात महाविकास आघाडी राहिली कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित करुन "महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा पक्षातील एका नेत्याने एक जाहिरात प्रकाशित करून त्यांची भूमिका जाहीर केली आहे. असे असताना धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरणाऱ्या महाविकास आघाडीचा हा दुटप्पीपणा आहे," अशी टीका अबू आझमी यांनी केली. शिवसेना उबाठाच्या भूमिकेमुळे समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडत असून, आता आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष नसल्याची भूमिका आझमी यांनी स्पष्ट केली.
कोणतीही पूर्व सूचना आलेली नव्हती : "महाविकास आघाडीकडून आम्हाला शपथ न घेण्याबाबत कोणतीही पूर्व सूचना आलेली नव्हती. त्यामुळे आम्ही विधिमंडळाच्या प्रथा परंपरांचे पालन केले व आमदारकीची शपथ घेतली. 'मविआ' धर्मनिरपेक्ष असल्याने आम्ही त्यांच्यासोबत होते. मात्र, त्यांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका पुढे नेण्याचा विचार केला असेल तर आम्ही पुढील विचार करू," अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दिली.
अबू आझमी यांनी घेतली आमदारकीची शपथ : विधानसभा निवडणुकीतील निकालावर महाविकास आघाडीकडून संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळं महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. पण अबू आझमी यांनी मात्र विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत आता फूट पडली. अबू आझमी आणि भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख हे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानं महाविकास आघाडीचं संख्याबळ दोनने कमी झालं आहे.
हेही वाचा -
- विधानसभा विशेष अधिवेशन 2024 : गुलाबी फेटे अन् चेहऱ्यावर हसू छान छान ; अजित पवारांचे आमदार पोहोचले सदनात, विरोधक रुसले
- लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमनं 31 जागा दिल्या तेव्हा ते चांगलं आणि आता..., अजित पवारांचं टीकास्त्र
- मारकडवाडी नव्या भारताच्या इतिहासातील आधुनिक दांडी मार्च, जितेंद्र आव्हाडांचं विधान