मुंबई Abhishek Ghosalkar Funeral :शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी (8 फेब्रुवारी) मॉरिस नामक गुंडानं फेसबुक लाईव्हदरम्यान गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर मॉरिस याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या संपूर्ण घटनेनंतर महाराष्ट्रासह मुंबईत एकच खळबळ उडाली असून अभिषेक घोसाळकर यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी हजारो लोकांनी गर्दी केली आहे.
संपूर्ण मुंबई हादरली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दुपारी अभिषेक घोसाळकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या 'औदुंबर' या निवासस्थानी पोहोचले. घोसाळकर कुटुंबीयांवर ओढवलेल्या या संकट प्रसंगी संपूर्ण ठाकरे कुटुंब आणि पक्ष त्यांच्यासोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितले. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी आठवड्याभरापूर्वीच पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यानंतर गुरुवारी (8 फेब्रुवारी) अचानक ही घटना घडल्यानं संपूर्ण मुंबई हादरली आहे. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोव्हा या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून वाद होता आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर ही हत्या झाली असल्याचं बोललं जात आहे.