मुंबईLok Sabha Elections : 2024 लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असताना दिल्लीतील आम आदमी पक्षानं महाराष्ट्रात एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुतीसह महाविकास आघाडी छोट्या घटक पक्षांना सोबत घेऊन आपली ताकद मजबूत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. महायुतीनं राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडं आम आदमी पक्षानं महाराष्ट्रात एकही उमेदवार उभा न करता 'इंडिया आघाडी'ला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचा निर्णय महाविकास आघाडीसाठी किती फायद्याचा ठरणार, हे येणारा काळचं ठरवणार आहे.
भाजपाला कुठलीही रिस्क नको :2024 च्यालोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. अबकी बार 400 'पार'चा नारा देणारा भाजपा संपूर्ण देशात जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येतील याकडं कटाक्षानं लक्ष देऊन आहे. महाराष्ट्रात महायुती मजबूत असतानासुद्धा भाजपानं राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच राज ठाकरे यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. वास्तविक राज ठाकरे यांच्या पक्षाचं महाराष्ट्रासह मुंबईतील वजन पाहता त्यांची फार काही जास्त महायुतीला मदत होईल, असं चित्र दिसत नाही. मागील निवडणुकीतील त्यांच्या मतांची टक्केवारी जेमतेम अडीच टक्के होती. परंतु सध्याच्या घडीला कुठल्याही परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी भाजपा कुठलीही कसर ठेवताना दिसत नाहीये. या अनुषंगानं महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मनसेला विरोध असतानाही राज ठाकरे यांना भाजपानं साथीला घेतलं आहे.
महाराष्ट्रात नाही पण इतर राज्यात जोरकस प्रयत्न :लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाला महायुतीकडून इतकं महत्त्व दिलं जातं?, आम आदमी पक्षानं निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहण्याचा घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात आम आदमी पक्ष लोकसभेची एकही जागा लढणार नाही. कारण आम आदमी पक्षानं इंडिया आघाडीला राज्यात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाची ताकद त्यामानानं राज्यात कमी नाही. परंतु सध्याच्या घडीला पक्षानं 2024 च्या विधानसभा, त्यानंतर 2025 मध्ये होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर जास्त लक्ष दिलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदी पक्षाच्या उमेदवारानं अनेक ठिकाणी 50 ते 70 हजार मतांचा टप्पा पार केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात आम आदमी पक्ष उतरला नव्हता. त्याचप्रमाणं यंदाही आम आदमी पक्षानं महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हरियाणा, दिल्ली, गुजरात, पंजाब या ठिकाणी आम आदमी पक्षानं पूर्ण ताकतीनिशी उमेदवार उभे केले आहेत.